गुणवत्तेची कास धरा, मराठी विद्यापीठाला संपूर्ण सहकाय
उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

* अभिजात भाषा परिषदेला सुरवात
अमरावती /6 ऑक्टोबर : सुमारे अडीच हजार वर्षांचा इतिहास मराठी भाषेला लाभला आहे, त्यामुळे मराठीत संशोधन करणे आवश्यक आहे. मराठीच्या विकासासाठी रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ सुरू करण्यात आले असून, विद्यापीठाने गुणवत्तेची कास धरावी, यासाठी आवश्यक सर्व सहकार्य देण्याची ग्वाही उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात 11 अभिजात भाषांच्या प्रतिनिधींच्या परिषदेची सुरुवात झाली. यावेळी संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बाराहाते, मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवळगावकर, विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव डॉ. मनिष जोशी, मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुळकर्णी आणि सहसचिव अभय खांबोरकर आदी उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले की, आज जगात संशोधनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे, ज्यातून पेटंट आणि रॉयल्टी मिळविण्याचे प्रयत्न होत आहेत, त्यामुळे आपल्यालाही यात मागे राहू नये. गेल्या कालावधीत केलेल्या प्रयत्नांमुळे भारत जागतिक स्टार्टअपमध्ये अग्रस्थान पटकावू शकला आहे. जागतिक महासत्ता होण्यासाठी शिक्षण आणि संशोधनावर भर देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना तांत्रिक विषय आत्मसात करण्यासाठी अभ्यासक्रमाचे शिक्षण मराठीतून देण्यात येत आहे. गेल्या सत्रात ६७ टक्के तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी मराठीतून परीक्षा दिली, आणि मातृभाषेत शिक्षण मिळाल्यामुळे विषय समजण्यास मदत झाली, ज्यामुळे एका वर्षात तंत्रनिकेतनमधील प्रवेश दुप्पट झाला.
मराठी विद्यापीठाचा विषय शासनाने गंभीरपणे घेतला असून आवश्यक जागा भरण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच विद्यापीठाच्या बांधकामासाठी सर्व परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठाने अत्युच्च दर्जाचे शिक्षण देणारी व्यवस्था उभारावी, अभ्यासक्रम शिकविणारे तज्ज्ञ आणावे आणि सुसज्ज ग्रंथालय उभारावे. स्वातंत्र्यानंतर नोंदी कमी झाल्यामुळे स्पष्ट, मुद्देसूद नोंदीसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे, आणि परिषदेत या विषयावर मंथन होणार आहे. त्यामुळे ही परिषद मराठीच्या भविष्यातील वाटचालीसाठी ऐतिहासिक ठरणार आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले. डॉ. आवळगावकर यांनी प्रास्ताविकात परिषदेच्या आयोजनामागील भूमिका सांगितली आणि मराठी विद्यापीठाच्या वाटचालीचा आढावा घेतला. श्री. कुळकर्णी यांनी परिषद भाषेमध्ये मोठे काम करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले, तसेच श्री. जोशी यांनी परिषदेत झालेल्या चर्चेनुसार यूजीसी कार्य करणार असल्याचे सांगितले. सुरवातीला मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथ दिंडी काढण्यात आली, आणि क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले.




