तिची’ मूक वेदना ठरली व्यवस्थेवरील जनआक्रोश
श्री हव्याप्र मंडळाच्या विद्यार्थ्यांचा थक्क करणारा कलाविष्कार

* स्किट, काकांकिकामध्येही ठरलेत अव्वल
अमरावती /23 डिसेंबर : एका अल्पवयीन, निष्पाप मुलीवर दोन नराधम मुलांनी केलेला लैंगिक अत्याचारा आणि त्या घटनेत पीडितेला न्याय मिळण्यात आलेल्या अपयशाची भीषण वास्तवता आणि त्यातून उभा राहणारा सामाजिक प्रश्न अधोरेखित करणारी अत्यंत संवेदनशील मूक नाटिका अमरावती विद्यापीठाच्या युवारंग महोत्सवात सादर करण्यात आली. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाद्वारा संचालित डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अभियांत्रिकी महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या मूक नाटिकेला प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले.
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यानी साकार केलेल्या या मूक नाटिकेचा विषय मन हेलावून टाकणारा आहे. लैंगिक अत्याचार सारख्या गंभीर गुन्ह्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी न्यायालयात न्यायासाठी दाद मागितली. मात्र कायदेशीर प्रक्रियेत न्याय न मिळाल्याने त्यांची निराशा, असहाय्यता आणि मनातील आक्रोश वाढत गेला. अखेरीस व्यवस्थेवरचा विश्वास उडाल्यानंतर पालकांनी कायदा हातात घेण्याचा टोकाचा मार्ग स्वीकारल्याचे या नाटिकेत प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.
संवादाविना केवळ अभिनय, हावभाव आणि दृश्यांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या या मूक नाटिकेने न्यायव्यवस्थेतील विलंब, पीडित कुटुंबाची मानसिक घुसमट आणि समाजाची असंवेदनशीलता यावर तीव्र भाष्य केले. प्रेक्षकांच्या मनात प्रश्नांची मालिकाच उभी करणार्या या सादरीकरणाने सभागृहात शांतता पसरली होती. परीक्षकांनी या मूक नाटिकेच्या विषयाची गंभीरता, सादरीकरणातील प्रामाणिकपणा आणि सामाजिक जाणीव यांचे विशेष कौतुक केले. ही नाटिका केवळ कलात्मक सादरीकरण न राहता समाजाला आरसा दाखवणारा प्रभावी संदेश ठरली, अशी भावना परीक्षक आणि श्रोता वर्गाकडून व्यक्त करण्यात आले.




