धामणगाव तालुका तालुक्यात मुसळधार पावसाने नदी-नाल्यांना पूर

दत्तापुरच्या भोईपुरा येथील 20 कुटुंब स्थलांतरित

* अनेक गावात पाणी तुंबले

धामणगाव रेल्वे/13 ऑगस्ट  : कोसळधार पावसाने तालुक्यात बुधवारी (ता.13) नदी-नाल्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.दरम्यान दत्तापुर येथील भोईपुरा परिसरात पावसाचे पाणी शिरल्याने येथील 20 कुटुंब स्थलांतरित करण्यात आले.संततधार पावसाने शेतीशिवारात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.अतिपावसाने नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली व जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाच्या दीर्घकाळ विश्रांती नंतर मागील काही दिवसात तालुक्याला जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. दरम्यान बुधवारी सकाळपासूनच संततधार पावसाला सुरुवात झाली.दिवसभर झालेल्या कोसळधार पावसात कपाशी, सोयाबीन,तुर,मुंग खरीप इत्यादी पिके पाण्याखाली आली होती.नदी-नाल्यांना पूर आल्याने तालुक्यात काही ठिकाणी रहिवासी भागात पाणी शिरले होते.शहरातील दत्तापुर येथील चंद्रभागा नदीला पूर आल्याने भोईपुरा परिसरात पुराचे पाणी शिरले.येथील 20 कुटुंबियांना नगर परिषद समाजमंदिर,शाळा व सभागृतात स्थलांतरित करण्यात आले आहे.यावेळी पावसाचे पाणी वाढत असल्याने संभाव्य धोका वाढत पहात आपत्कालीन प्रतिसाद दल (डीडीआरएफ) बोलविण्यात आले.यावेळी जवळपास इतरही 45 कुटुंबियांना स्थलांतरित करण्याची तयारी तहसीलदार अभय घोरपडे यांनी दाखविली.सोनेगाव खर्डा येथील चंद्रभागा नदीला आलेल्या पुराने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.विरुळ रोंघे येथे पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले व अति पावसाने गावातून गेलेल्या नाल्याला पूर आला होता.मुसळधार पावसामुळे तालुक्यात शेतशिवारात लोट वाहू लागल्याने शेकडो हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याच धोका निर्माण झाला आहे त्यामुळे सततच्या धुवांधार पावसाने बाधित क्षेत्र व शेती पिकांच्या मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. वर्धा नदीपात्रात दुथडी पाणी वहात असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

संबंधित बातम्या

Back to top button