मुसळधार पावसाने मोर्शी तालुक्यात शेतीचे नूकसान
362.48 हेक्टरमधील पिके बूडाली

-घराचे छप्पर उडाले, भिंती कोसळल्या
मोर्शी / 23 जुलै : मोर्शी शहरासह तालुक्यात काल मंगळवारी, 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नूकसान झाले आहे. तसेच मोर्शी शहरात एका घराचे छप्पर उडून भिंतीही कोसळल्या. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र झाली आहे. तालुक्यातील नेरपिंगळाई मंडळ, शिरखेड मंडळ, मोर्शी मंडळात एकूण 362.48 हेक्टर आर शेती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे.
मोर्शी तालुक्यात काल जवळपास तीन ते चार तास मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे शेतात सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. त्याचा शेती पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. मोर्शी शहरातील अजय वामन पवार यांच्या घराचे छप्पर उडून घराच्या भिंतीसुद्धा कोसळल्या. मुसळधार पाउस आणि वार्यामुळे अजय पवार यांचे घर पूर्णत: क्षतीग्रस्त झाले. त्यात त्यांचे मोठे नूकसान झाले आहे. नेरपिंगळाई मंडळातील राजुरवाडी येथील 80 हेक्टर, शिरखेड मंडळातील मौजा आखतवाडा येथील 100 हेक्टर, मौजा लिहिदा येथील 40 हेक्टर, मौजा बर्हाणपूर येथील 30 हेक्टर, लेहगाव येथील 20 हेक्टर, व पुसला येथील 88 हेक्टर असे एकूण 358 हेक्टरमधील शेती पिकाचे नुकसान झाले.
तसेच मोर्शी मंडळातील मौजा येरला येथील 3.48 हेक्टर, अंबाडा मंडळातील चिखलसावंगी येथील 1 हेक्टर असे एकूण 362.48 हेक्टरमधील पीक बुडाले. याबाबतचा अहवाल तहसील कार्यालय मोर्शी येथे प्राप्त झाला असून लवकरच पंचनाम्याची कार्यवाही सुरू होणार असल्याचे तहसीलदार विनोद वानखडे यांनी सांगितले.




