मेळघाटात मुसळधार, सिपना नदीला पूर

पर्यटकांना सावधतेचा इशारा

अमरावती / 17 जुलै : मेळघाटात कालपासुन मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. मेळघाटच्या प्रसिद्ध सिपना नदीला देखील पूर आलाय. मेळघाटची जीवनदायिनी अशी ओळख असणारी सिपना नदी बुधवारी रात्री पासून धुंवाधार पावसामुळे दुथडी भरुन वाहत आहे. सिपना नदीला आलेल्या पुरामुळं नदीकाठच्या गावांना सावधतेचा इशारा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.
सिपना नदीचं विशाल पात्र सेमाडोह आणि हरिसाल या दोन गावालगत आहे. नदीला आलेल्या पुरामुळं दोन्ही गावातील रहिवाशांना अलर्ट राहण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलाय. सेमाडोहपेक्षा हरिसाल गावाला नदीच्या पुराचा अधिक धोका आहे. चार वर्षांपूर्वी आलेल्या पुरामुळं अनेक घरं वाहून गेली होती. त्यानंतर बुधवारी रात्री आलेल्या पुराचा जोर गुरुवारी सकाळपर्यंत कायम होता. सकाळी नऊ वाजल्यानंतर मात्र नदीचा पूर काहीसा ओसरला.
पावसाळ्यात मेळघाटात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. संपूर्ण मेळघाटात पावसाचं वातावरण असून, सिपना नदीला आणखी मोठा पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. त्यामुळं पर्यटकांनी नदीच्या काठावर जाऊ नये, असं आवाहन सेमाडोह वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप तलखंडकर यांनी पर्यटकांना केलंय. मेळघाटचं संपूर्ण जंगल सागवान वृक्षांनी वेढलं आहे. मेळघाटात कोरकू जमातीमध्ये सागवानला सिपना असं म्हणतात. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या अगदी सीमेवर असणार्‍या डोंगरावरील भोंडियाकुंड या ठिकाणी सागवान वृक्षांच्या मुळातून या नदीचा उगम होत असल्यानं या नदीचं नाव सिपना असं पडलं असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.
सिपना नदी ही सेमाडोह, हरिसाल, धारणीच्या दिशेनं खोल दरीतून वाहत जाते. सेमाडोहच्या समोर कोलकास येथे उंचावर असणार्‍या वनविश्रम भवनच्या खाली दुथडी भरून वाहणार्‍या या नदीचं दृश्य आता पुरामुळं अंगावर शहरे आणणारं आहे. ही नदी हरिसालच्या पुढे जंगल, दरीतून वाहत समोर तापी नदीत विलिन होते.

संबंधित बातम्या

Back to top button