मेळघाटातील वीज संकटामुळे आरोग्यसेवेची झुंज

जनरेटरच्या आधारावर 76 शस्त्रक्रिया

* हिवाळी अधिवेशनात या प्रश्नांकडे लक्ष जाणार का?

अमरावती /8 डिसेंबर – अमरावती जिल्ह्यातील अतिदुर्गम मेळघाट परिसरातील आरोग्यसेवा पुन्हा संकटात सापडली आहे. चिखलदरा व धारणी तालुक्यातील अनेक आरोग्य केंद्रांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाला. तरीही डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्‍यांनी जनरेटरचा आधार घेत तब्बल 76 शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करत मानवतेची सेवा कायम ठेवली. त्यांच्या या धडाडीचे कौतुक होत असले तरी आरोग्य यंत्रणेतील ढासळलेले नियोजन आणि सरकारी उदासीनता यावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असले तरी मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू आणि आरोग्य सुविधांच्या दुरवस्थेवर विधिमंडळात ठोस चर्चा होणार का, याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मेळघाटातील वेदना वर्षानुवर्षे राज्याच्या चर्चेतून दूरच राहिल्या आहेत. आरोग्य, वाहतूक, मनुष्यबळ आणि मूलभूत सुविधांचा अभाव आजही भयावह स्वरूपात कायम आहे.
अतिदुर्गम भागातील समस्या न्यायालयाच्या दृष्टीस गेल्यानंतरच शासनाची मशीनरी सक्रिय झाली. नुकताच वरिष्ठ प्रधान सचिवांच्या मार्गदर्शनाखालील समितीने मेळघाटाचा प्रत्यक्ष दौरा केला. या पाहणीत आरोग्य केंद्रांतील अनेक त्रुटी उघड झाल्या असून त्या संदर्भातील अहवाल 18 डिसेंबर रोजी न्यायालयात सादर केला जाणार आहे. मात्र अहवालाच्या पुढे जाऊन प्रत्यक्ष बदल घडवून आणणे हाच जनतेचा खरा आग्रह आहे. मेळघाटातील आरोग्य केंद्रांमध्ये इमारती आहेत; पण आवश्यक साधनसामग्री, नियमित वीजपुरवठा, औषधांचा साठा आणि तज्ज्ञ डॉक्टरांची व्यवस्था अद्याप अपुरीच आहे. प्रसूती विभागांसह आप त्कालीन उप चारांवर नेहमीच जीवघेणा धोका कायम राहतो. रुग्णवाहिका आणि तपासणी केंद्रांची मर्यादित उपयुक्तता जनतेच्या हालअपेष्टा वाढवते. या सर्व अडथळ्यां मध्येही डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी अथकपणे रुग्णसेवा बजावत आहेत. मात्र केवळ त्यांच्या जिगर आणि समर्पणावर संपूर्ण आरोग्यव्यवस्था चालू नये. मूलभूत सुविधा पुरवणे ही शासनाची जबाबदारी आहे आणि ती आता तातडीने पार पाडलीच पाहिजे. हिवाळी अधिवेशनात मेळघाटाचा प्रश्न केवळ चर्चेपुरता मर्यादित न राहो. या भूमीतील प्रत्येक नागरिकाचा आरोग्याचा हक्क सुरक्षित व्हावा. रुग्णालयांतील अंधार दूर होऊन उजेडाने जीव वाचवणारी प्रत्येक शस्त्रक्रिया पार पडावी, हीच मेळघाटातील जनतेची मोठी अपेक्षा आहे.

संबंधित बातम्या

Back to top button