गाडगेनगरात भर पावसात हॉकर्स युनियनचे आंदोलन
अतिक्रमन निर्मूलन कारवाईला तीव्र विरोध

-आधी पर्यायी जागा देण्याची मागणी
-युवा स्वाभिमान संघटनेचा पुढाकार
अमरावती / 27 जुलै : शहरातील रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणारे लहान व्यावसायिक आणि फेरीवाले यांना व्यवसायासाठी पर्यायी जागा न देताच महापालिकेने त्यांचे अतिक्रमन हटविण्याची कारवाई सुरु केल्याने या व्यावसायिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. महापालिकेच्या कारवाईला विरोध दर्शविण्यासाठी आज दुपारी भर पावसात गाडगेबाबा समाधी मंदिरासमोर युवा स्वाभिमानी हॉकर्स युनियनच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी हाताला काळ्या फिती बांधून या व्यावसायिकांनी निदर्शने केली आणि महापालिकेच्या कारवाईचा निषेध नोंदविला.
संघटनेचे अध्यक्ष गणेश मारोडकर यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदालनात संबंधित व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महापालिकेची ही कारवाई अन्यायकारक असून शहर फेरीवाला धोरण 2014 या कायद्याचे उल्लंघन त्यातून होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या कायद्यांतर्गत हॉकर्स विरोधी कुठलीही कारवाई करण्याआधी टाऊन वेल्डिंग कमिटीची बैठक घेणे अनिवार्य आहे. परंतु अमरावती महानगरपालिकेने टाऊन वेल्डिंग कमिटीची बैठक न घेताच परस्पर आदेश काढून हॉकर्स विरुद्ध अतिक्रमणाची कारवाई सुरू केली, त्यामुळे ही कारवाई नियमबाह्य ठरत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे होते. कारवाईच्या धसक्याने फेरीवाले आणि लहान व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद केले आहे. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट आले आहे. असे यावेळी सांगण्यात आले.
हॉकर्सला व्यवसायासाठी आधी शहरात पर्यायी जागा उपलब्ध करुन द्यावी, हॉकर्स झोन निश्चित केले जावे आणि त्यानंतरच कारवाई केली जावी, अशी मागणी यावेळि करण्यात आली. कारवाईदरम्यान जप्त केलेले साहित्य स्क्रॅप करणार असल्याचे बोलले जात आहे. आधीच आर्थिक संकटांचा सामना करणार्या या व्यावसायिकांवर अन्याय असल्याने हे साहित्य त्यांना परत करावे, अशी मागणीही करण्यात आली. आगामी काळात नागपंचमी, रक्षाबंधन, गणपती, नवरात्र, दिवाळी यासारखे सन आहेत, या लहान व्यावसायिकांकरिता हे सण म्हणजे एक संधी असते. त्यामुळे ही कारवाई थांबविली जाणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शहरात हॉकर्ससठी अन्यायकारक ठरत असलेली अतिक्रमन निर्मूलन कारवाई अशीच सुरु राहीली तर महापालिकेचा निषेध नोंदविण्यासाठी येत्या मंगळवारी, 29 जुलै रोजीच्या नागपंचमीच्या दिवशी कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या समाधी मंदिरामध्ये हॉकर्स युनियनकडून मीठ आणि भाकर खाऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी स्वाभिमान हॉकर्स युनियनने दिला. यावेळी गणेश मारोटकर, दिगंबर कोरडे, निलेश कोरडे, सारिका राऊत, जावेद भाई, अभय रायेकवार, संदीप भुयार, कांताबाई, संगीताबाई शिरभाते, उमेश इंगोले, उमाबाई आमले, अंकुश तळकीत, आशिष ढोले, देवा आमले, राजा साहू, मोहन सदाफळे, रितेश पुरी आदी उपस्थित होते.




