अतिक्रमनातील हातगाड्या व साहित्य जप्त

बडनेरा प्रभागात धडक कारवाई

-वाहतुकीस अडथळा, स्वच्छतेस धोका
-नियमभंग करणार्‍यांवर मनपाचा हातोडा
अमरावती / 12 सप्टेंबर : अमरावती महानगरपालिकेने शुक्रवारी दुपारी एक वाजल्यापासून झोन क्रमांक 4 अंतर्गत बडनेरा प्रभागात मोठी कारवाई केली. रस्त्यांवर बेकायदेशीररीत्या उभ्या असलेल्या हातगाड्या, फूटपाथवरील अतिक्रमण व अनधिकृत विक्रेत्यांचे साहित्य मनपाने जप्त केले.
नवाथे प्लॉट मुख्य चौकात हातगाड्यांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे संपूर्ण चौक मोकळा करून गाड्या हटविण्यात आल्या. त्याचबरोबर जुनीवस्ती सावता मैदानानजीक मटन विक्रेत्यांवरही पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी पंकज कल्याणकर यांच्या समन्वयाने कारवाई करून सर्व साहित्य जप्त करण्यात आले. याशिवाय बडनेरा पोलीस स्टेशन चौक ते जय हिंद चौक, जयस्तंभ चौक, सर्किट हाऊस रोड व शिवाजी महाराज पुतळा परिसर या मार्गांवर उभ्या हातगाड्या, काटे, कॅरेट व विविध साहित्य मनपाने ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान रस्ते पूर्णपणे मोकळे करून वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेण्यात आली.
महानगरपालिकेने स्पष्ट केले की, शहरातील स्वच्छता, सुरक्षितता व वाहतुकीची शिस्त राखण्यासाठी अशा कारवाया नियमितपणे सुरू राहतील. रस्त्यांवर गाड्या उभ्या करणे, फूटपाथ व्यापणे किंवा अनधिकृतरीत्या विक्री साहित्य ठेवणे हा नियमभंग असून, अशा प्रकारे आढळल्यास कठोर कारवाई करून साहित्य जप्त करण्यात येईल. मनपाने सर्व नागरिक, हातगाडीधारक व व्यावसायिकांना आवाहन केले आहे की, रस्ते मोकळे ठेवा, स्वच्छ शहर उपक्रमात सहभागी व्हा आणि मनपा प्रशासनाला सहकार्य करा.

संबंधित बातम्या

Back to top button