10 वर्षांच्या मुलीच्या पोटातून निघाला अर्धा किलो केसांचा गोळा

शस्त्रक्रिया करणारे डॉक्टरही थक्क

अमरावती / 30 जुलै : अमरावती शहरात एका 10 वर्षांच्या मुलीच्या पोटातून डॉक्टरांनी शस्त्रक्रियेने अर्धा किलो केसांचा गोळा बाहेर काढला. ही घटना वैद्यकीय दृष्टिकोनातून अत्यंत दुर्मिळ असून डॉक्टरही या प्रकारामुळे थक्क झाले आहेत. सदर मुलीला गेल्या काही महिन्यांपासून उलट्या होणे, भूक न लागणे आणि वजन सतत कमी होत जाण्याच्या तक्रारी होत्या. या कारणांमुळे तिला अमरावतीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर आणि समुपदेशनानंतर मुलीने डॉक्टरांना सांगितले की तिला केस खाण्याची सवय आहे.
रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. उषा गजभिये यांनी सांगितले की, तपासणीत मुलीच्या पोटात केसांचा मोठा गोळा आढळून आला. शस्त्रक्रियेवेळी आम्हाला तिच्या पोटात सुमारे अर्धा किलो केसांचा गोळा सापडला, जो यशस्वीपणे बाहेर काढण्यात आला. सध्या मुलगी बरी आहे, ती व्यवस्थित जेवू शकते आणि तिची तब्येत सुधारते आहे, असे त्यांनी सांगितले. ही स्थिती वैद्यकीय भाषेत ट्रायकोबिझोआर म्हणून ओळखली जाते, जी ट्रायकोफेजिया या मानसिक अवस्थेमुळे निर्माण होते. यामध्ये रुग्ण केस खात राहतो, ज्यामुळे पोटात केसांचा गोळा तयार होतो.
डॉ. गजभिये यांनी सांगितले की, मुलीला लवकरच रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. तिच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने समुपदेशन आणि योग्य मार्गदर्शन दिले जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button