अंजनगाव-मेळघाटात गारपीट
आभाळ फाटलं; विजांच्या तांडवात बळीराजाचा काळजाचा ठोका चुकला

* वनोजा बागेत 400 वर्षांच्या परंपरेला गारपिटीचं ग्रहण; यात्रेकरूंची दाणादाण
अंजनगाव सुर्जी / 19 मार्च : निसर्गाने पुन्हा एकदा आपला क्रूर चेहरा दाखवला असून, गुरुवारी दुपारी आणि मध्यरात्री झालेल्या तुफान वादळी पावसासह भीषण गारपिटीने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ऐतिहासिक वनोजा बाग येथील श्री लखमाजी महाराज यात्रेत निसर्गाच्या या तांडवाने अक्षरशः धुमाकूळ घातला. गुढीपाडव्याचा सण आणि यात्रेचा मोठा उत्साह असतानाच, दुपारी चारच्या सुमारास आकाशातून बर्फाच्या गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला आणि पाहता पाहता 400 वर्षांची परंपरा असलेल्या यात्रेची धूळदाण उडाली. हजारो भाविकांची पळापळ झाली, तर हातावर पोट असलेल्या व्यापार्यांची स्वप्ने चिखलात मिसळली. दुसरीकडे, मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यात विजांच्या कडकडाटासह आभाळ फाटल्याने हाताशी आलेल्या सोन्यासारख्या पिकाचा घास निसर्गाने हिरावला आहे. बळीराजा आता या अस्मानी संकटापुढे पूर्णपणे हतबल झाला असून संपूर्ण जिल्ह्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.
वनोजा बाग येथे लखमाजी महाराज यात्रेनिमित्त अलोट गर्दी उसळली होती. ग्रामीण भागातील हजारो भाविक दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी दाखल झाले होते. मात्र, निसर्गाने आपला क्रूर चेहरा दाखवत अचानक वादळी वार्यासह गारपीट सुरू केली. वार्याचा वेग इतका प्रचंड होता की, यात्रेतील दुकानांचे तंबू कागदासारखे हवेत उडाले. काही क्षणातच झालेल्या मुसळधार पावसाने व्यापार्यांचा लाखो रुपयांचा माल भिजवून मातीमोल केला. महेंद्र भगत यांसह अनेक स्थानिक प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, नवस फेडण्यासाठी आलेल्या भाविकांचे रोडग्यांचे कार्यक्रम अर्धवट राहिले. काहींनी आपला जीव वाचवण्यासाठी मंदिर परिसर, हॉल आणि मिळेल त्या आडोशाला धाव घेतली. मंदिर परिसरात गुडघाभर चिखल साचल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहने रुतून बसली. भाविकांना आणि वाहनधारकांना आपली वाहने बाहेर काढण्यासाठी भर पावसात जीवाचे रान करावे लागले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या निसर्गाच्या प्रहाराने सामान्य माणसाचे आर्थिक कंबरडे पुरते मोडून काढले आहे.
मेळघाटातील चित्र तर काळजाचा थरकाप उडवणारे आहे. चिखलदरा तालुक्यातील चुरणी, बोद आणि लाखेवाडा परिसरात गारपिटीने रब्बी हंगामातील पिकांची राखरांगोळी केली आहे. धारणी तालुक्यातील चाकरदा परिसरात मध्यरात्री अकराच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने रौद्र रूप धारण केले. सध्या शिवारात सोन्यासारखा गहू डोलत असून सोंगणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. अशातच कोसळलेल्या पावसामुळे कापून ठेवलेला गहू पूर्णपणे भिजला असून दाणे काळे पडण्याची भीती निर्माण झाली आहे. आभाळ पार फाटायच्या आत गव्हाचं कणीस घरात यायला हवं, या एकाच आशेने शेतकरी रात्रभर डोळ्यात तेल घालून चिखलात मळणी यंत्रांसाठी (थ्रेशर) धडपडत होता. मजूर टंचाई आणि यंत्रांच्या तुटवड्यामुळे शेतकर्यांची मोठी कोंडी झाली असून, उभ्या पिकाचे डोळ्यादेखत नुकसान होताना पाहून बळीराजा ढसाढसा रडत आहे.
चांदूर रेल्वे परिसरात वीज कोसळल्याच्या घटनांनी परिसरात दहशतीचे वातावरण आहे. अवकाळीच्या या तडाख्यामुळे कांदा, गहू आणि भाजीपाला उत्पादक शेतकरी देशधडीला लागला आहे. तहसीलदार जीवन मोरानकर यांनी सीमावर्ती भागातील परिस्थितीचा आढावा घेण्याचे आणि महसूल विभागाला तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने आता केवळ कागदी घोडे न नाचवता, थेट बांधावर जाऊन मदतीच्या हात द्यावा, अशी संतप्त आणि आक्रमक मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे ग्रामीण अर्थचक्र कोलमडले असून, बळीराजा पुन्हा एकदा सरकारकडे डोळे लावून बसला आहे.
रक्ताचं पाणी केलं, पण निसर्गाने माती केली! -रात्रभर विजा चमकत होत्या आणि शेतकरी उघड्या माळावर आपला गहू वाचवण्यासाठी ताडपत्री घेऊन झुंजत होता. थ्रेशर मालकांकडे विनवण्या करताना शेतकर्यांच्या डोळ्यांतलं पाणी पावसाच्या धारांपेक्षाही जड होतं. ज्या गव्हाने घर चालणार होतं, पोरीचं लग्न होणार होतं, तोच आता काळा पडण्याच्या भीतीने बापाच्या काळजाचा ठोका चुकला आहे.




