पालकमंत्री बावनकुळेंची आज परतवाड्यात जाहीर सभा
शहरात स्वागतासाठी जोरदार तयारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

परतवाडा /26 नोव्हेंबर : अचलपूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज, 27 नोव्हेंबर रोजी महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भव्य प्रचारसभा नेहरू मैदान, परतवाडा येथे आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 10 वाजता होणार्या या सभेसाठी शहरात उत्साहाचे वातावरण असून कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये मोठी चळवळ दिसून येत आहे.
अचलपूर नगरपरिषदेसाठी भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमे दवार रूपाली अभय माथने यांच्या प्रचारार्थ ही सभा होत आहे. तसेच नगर सेवक पदाच्या एकूण 38 उमेदवारांना बळ देण्याच्या उद्देशाने ही सभा महत्त्वाची ठरणार आहे. भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, आघाडी-सेलचे संयोजक, विविध संघटनांचे अध्यक्ष आणि मोठ्या संख्येने नागरिक या सभेला उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. पालकमंत्री बावनकुळे यांच्या आगमनानिमित्त शहरात ठिकठिकाणी स्वागतद्वारे, फलक, बॅनर आणि सजावट करण्यात आली आहे. नेहरू मैदान तसेच सभास्थळाच्या परिसरात शेवटच्या क्षणापर्यंत तयारी सुरू असून वातावरण मोठ्या राजकीय मेळाव्याची अनुभूती देत आहे. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला असून शहरभर मोठा फौजफाटा दिसत आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी पोलिसांनी विशेष योजना आखली आहे. आज होणार्या या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




