विजय मार्केटिंगवर जीएसटी पथकाची धाड
मोबाईल हँडसेट विक्रेत्यांमध्ये उडाली खळबळ

* डझनावर अधिकार्यांनी घेतली झाडाझडती
* कर भरल्याचे कोणतेही कागदपत्र आढळले नाही
अमरावती/9 ऑक्टोबर : अमरावतीच्या जयस्तंभ चौकाजवळील सिटी कोतवालीसमोरील पालिका मार्केटमधील विजय मार्केटिंगवर गुरूवारी सेवा आणि वस्तू कर (जीएसटी) अधिकार्यांच्या मोठ्या पथकाने छापा टाकला. मोबाईल विक्रेत्यांवर टाकण्यात आलेला हा छापा आतापर्यंतचा सर्वात मोठा मानला जात आहे. 10 ते 15 अधिकार्यांनी झाडाझडती घेतली. अमरावती येथील जीएसटी सहाय्यक आयुक्त पोखरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, परंतु संपर्क साधता आला नाही.
विजय मार्केटिंगचा मोबाईल हँडसेट व्यवसाय मोठा असून, दररोजची उलाढाल 20-25 लाख रुपयांच्या आसपास आहे. फर्मला जीएसटी भरण्यासाठी नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या, मात्र जीएसटी न भरल्यामुळे दुकानावर छापा टाकण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार, या फर्मअंतर्गत आणखी दोन ते तीन फर्म कार्यरत आहेत, ज्यांचा ऑनलाइन मोबाईल हँडसेट व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे. आघाडीच्या कंपन्यांचे हँडसेट येथे सवलतीच्या दरात उपलब्ध असून, बहुतेक ऑर्डर आणि डिलिव्हरी ऑनलाइन केल्या जातात.
विजय मार्केटिंग सॅमसंग, रियलमी, वनप्लस इत्यादी नामांकित कंपनींचे मोबाइल हँडसेट विकते, परंतु फर्मकडे जीएसटी खाते नसल्यामुळे नोटिस पाठवल्या असूनही जीएसटी न भरल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. दसरा आणि दिवाळी सणामुळे मोबाइल हँडसेटची विक्री वाढली असून बाजारात ग्राहकांची गर्दी वाढली आहे. अशा परिस्थितीत विजय मार्केटिंगवर झालेल्या जीएसटीच्या धडक कारवाईमुळे सर्व डीलर्स आणि विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.




