नवसारी प्रभागातील विकासकामांचे भूमिपूजन

आ.सुलभा खोडके यांची उपस्थिती

64 लाख निधीतून होणार कायापालट

अमरावती /15 डिसेंबर व्यवसायसुलभ वातावरण, वीज, पाणी, शिक्षित – प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता, प्रभागा- प्रभागात रस्त्यांचे विस्तारित जाळे यासोबतच अमरावती शहराच्या जडणघडणीतील आगामी संधी, तसेच आव्हाने आणि त्या दिशेने उपाय करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नरत आहोत. पर्यावरण पूरक विकासामध्ये शाश्वत विकास ही संकल्पना महत्वाची आहे.कल्याणकारी योजनांची आखणी आणि अंमलबजावणी तसेच आर्थिक सुधारणा आणि विकासाचा एक मुख्य उद्देश सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावणे आणि आर्थिक सुधारणांतून स्वावलंबन साकारायला हवे,याला आपले सर्वतोपरी प्राधान्य आहे.मुलांसाठी क्रिडांगण, जॉगर्स पार्क, ओपन जिम आदि बाबींच्या उपलब्धतेमुळे सकारात्मक ऊर्जा लाभते.बांधकामे व नवीन योजना यासाठी तरतूद करताना प्रस्तावित कामाचे अंदाजपत्रक, जागेची निवड, प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी, निधीची उपलब्धतानुसार लोकांच्या कराचा पैसा विकासासाठी लागणे अपरिहार्य आहे, नव्हे ते बंधनकारक आहे.अमरावती शहरात पिण्याचे पाणी, घनकचरा, द्रव कचरा यांचे व्यवस्थापन योग्यरित्या झाले पाहिजे, यावर आपला भर आहे. शहरातील वंचित घटकांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांना सहकार्य करणे, शासकीय योजनांचा लाभ वंचित घटक, निराधार, विधवा, दिव्यांग व्यक्तींना मिळवून देणे यासाठी आपण कटीबद्ध आहोत.शहरामध्ये हरित क्षेत्र वाढवणे, वातावरण कृती आराखड्यात सुचवलेल्या उपायांची कठोर अंमलबजावणी करित नियोजन टप्प्यापासून अंमलबजावणी पर्यंत ही संकल्पना साकारण्यासाठी अधिकाधिक व्यापक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचून सर्व घटकांशी संवाद साधित सुंदर व विकसित शहर उभारण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. असे प्रतिपादन आ. सुलभाताई संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधून केले. रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी त्या प्रभाग क्रमांक -3 नवसारी अंतर्गत छत्रसाल नगर- हनुमान नगर- गजानन कॉलनी येथे रुपये 64 लक्ष निधीतून करण्यात येणार्‍या विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या. सर्वप्रथम आमदार – सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते छत्रसाल नगर स्थित संदीप रडके यांच्या घरापासून ते रुपेश नितनवरे यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे तसेच नालीचे बांधकाम करणे या विकासकामाचे भूमिपूजन करण्यात आले. तदनंतर न्यू हनुमान नगर स्थित शुभम तायडे यांच्या घरामागील नालीचे बांधकामाचे भूमिपूजनाची त्यांनी कुदळ मारीत औपचारिकता साधली. यासोबतच हनुमान नगर व गजानन कॉलनी येथील नालीचे बांधकाम करणे या कामाचे त्यांनी भूमिपूजन केले. यासोबतच पाठ्यपुस्तक मंडळ लगतच्या गजानन कॉलनी येथील खुल्या जागेला चेंनलिंग – फेंसिंग करणे या विकासकामांचे त्यांनी भूमिपूजन केले. आमदार – सौ. सुलभाताई खोडके यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून गेल्या पाच वर्षांपासून विकासाचा वाढता वेग यामुळे अमरावती शहरात भौतिक विकासाचे जागोजागी उमटू लागलेले चित्र आणि विकासाची फळंदेखील समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचावी यासाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी याकरिता घेतला जातं असलेला पुढाकार लक्षात घेता, आमदार – सौ. सुलभाताई खोडके, यश खोडके यांचा जागोजागी शाल – श्रीफळ – पुष्पगुच्छ देऊन स्थानिक नागरिकांच्या हस्ते स्नेहपूर्ण सत्कार करण्यात आला.एका अर्थाने अमरावतीत नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे, नव्या वाटा निर्माण केल्या जात आहेत. त्या वाटा प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी वेगवेगळ्या योजनाही आखल्या जात आहेत. या शब्दांत आमदार – सौ. सुलभाताई खोडके यांनी नागरिकांच्या वतीने करण्यात आलेल्या स्वागत – सत्काराचा स्वीकार करीत शब्दसुमनांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी यश खोडके यांच्या समवेत स्थानिक नागरिक तसेच छत्रसाल नगर, हनुमान नगर, गजानन कॉलनी येथील ज्येष्ठ नागरिक – महिला भगिनी – युवक – युवती प्रामुख्याने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button