कमलताई गवई यांनी पाठविले शुभेच्छापत्र
संघाच्या कार्याचे केले कौतुक

* प्रकृतीच्या कारणामुळे अनुपस्थिती
अमरावती /5 ऑक्टोबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे टाळले, मात्र कार्यक्रमासाठी शुभेच्छा देताना संघाच्या कार्याचे कौतुक केले. नरसम्मा हिरय्या महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यासाठी महानगर संघचालक उल्हास बपोरीकर यांना पत्र लिहून कमलताई गवई यांनी अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहता येणार नसल्याचे कळवले. आपल्या पत्रात त्यांनी मानवी जीवन मानवी मूल्यांनी विकसित झाले असून भारतीय संस्कृती आणि सभ्यता जगात सर्वोत्कृष्ट असल्याचे नमूद केले. भारत हा प्राचीन काळापासून धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्ट्या आदर्श राहिला असून बुद्ध, महावीर, अशोक, संत कबीर, संत तुकाराम, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, विवेकानंद, पेरियार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महापुरुषांनी मानवी मूल्यांना बळ दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि धर्मनिरपेक्षता यांच्या आधारावर भारतीय संविधानाची उभारणी केली असून त्यातून भारताची विकासाची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. भारत हा सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक वैविध्याने नटलेला देश असून लोकशाही मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून त्याचा विकास होत आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि धर्मनिरपेक्षतेच्या माध्यमातून भारताला एकजीव व सक्षम राष्ट्र बनवता येईल, असेही त्यांनी नमूद केले. संघाच्या स्वयंसेवकांनाही संविधानिक मूल्यांच्या माध्यमातून भारताला सक्षम राष्ट्र घडविण्याची मोठी संधी असल्याचे मत व्यक्त करत, 5 ऑक्टोबरला होणाऱ्या संघाच्या शताब्दीपुर्ती विजयादशमी उत्सवासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.




