शासकिय मेडिकल कॉलेज कोंडेश्वर मार्गावर नको
आ. सुलभा खोडकेंनी मांडला औचित्याचा मुद्दा

-कृषी विद्यापीठाच्या जागेचा प्रस्ताव दिला
अमरावती / 17 जुलै : अमरावतीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयासाठी सरकारने कोंडेश्वर मार्गावरील जागा प्रस्तावित केली असून हे ठिकाण जिल्ह्यातील नागरिकांसाठी गैरसोयीचे ठरु शकते, असे कारण देत अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी कोंडेश्वर मार्गावर मेडिकल कॉलेजच्या उभारणीला आपला ठाम विरोध दर्शविला आहे. महाविद्यालयासाठी नागपूर महामार्गालगत कृषी विद्यापीठाच्या जागेचा प्रस्ताव त्यांनी शासनासमोर मांडला आहे.
हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभा सभागृहात सुलभा खोडके यांनी आज यासंदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. कोंडेश्वर मार्गावरील वैद्यकिय महाविद्यालयाची प्रस्तावित जागा अमरावती शहरापासून 12 ते 15 किलोमीटर लांब असल्याने रुग्णांना तिथे जाणे अडचणीचे ठरणार आहे. जिल्ह्यातील मेळघाट-धारणी सारख्या दुर्गम भागासह अन्य तालुक्यारतील गोर-गरीब रुग्णांना वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळणे, हाच या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेचा उद्देश आहे. करण्याचे उद्दिष्ट आहे. रुग्ण व नातेवाईकांना रुग्णालयात पोहोचतानाच समस्यांचा सामना करावा लागला तर या प्रकल्पावर होणारा 500 ते 700 कोटी रुपयांचा खर्च निरर्थक ठरुन महाविद्यालयाची उपयुक्तता शून्य झाल्याशिवाय राहणार नाही. असे खोडके सभागृहात म्हणाल्या.
त्यामुळे जागेसंदर्भात समितीने घेतलेला निर्णय बदलविण्यात यावा, तसेच शहरातील नागपूर महामार्गा लगतच्या कृषी विद्यापीठाच्या जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव मान्य करावा, असे सांगत आ. सुलभा खोडके यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. खोडके यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यामागच्या भूमिकेसंदर्भात सभागृहाला अवगत केले. या महाविद्यालयात 100 विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय व 430 बेडचे रुग्णालय सुरु करण्याचे नियोजन आहे. प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्यामागे त्या-त्या जिल्ह्यातील व परिसरातील गरीब, गरजूंना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुण देणे, हा शासनाचा उद्देश असतो. आरोग्याच्या सुविधा जिल्ह्यातील लोकांना सहज उपलब्ध करुन देण्यासाठी हे महाविद्यालय व रुग्णालय शहरात किंवा जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असणे आवश्यक आहे, यावर खोडके यांनी भर दिला.
बायपास मार्गावरील कृषी विद्यापीठाची 7,35,351 चौरस मीटर म्हणजेच जवळपास 75 हेक्टर जागेपैकी 25 एकर जागा शासकीय महाविद्यालयाकरिता घेण्यात यावी, असा शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून यासंदर्भात जिल्हाधिकारी अमरावती व संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांनी वर्ष 2022 मध्ये डॉ. संजय पराते यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिलेले होते, असे खोडके यांनी सांगितले. ही जागा जिल्ह्यातील 12 तालुक्यातील रुग्णांना सहज पोहोचण्यासाठी सोयीची आहे, असे त्या म्हणाल्या.




