गोपाल नगर रेल्वे अंडरपासचे काम संथगतीने

पावसाचे पाणी साचल्याने अनेक समस्या

-आ. रवी राणा व मनपा आयुक्तांकडून निरिक्षण
-पाण्याच्या निचर्‍यासाठी यंत्रणा उभारण्याची मागणी
अमरावती / 11 जुलै: गोपाल नगर येथे रेल्वे क्रासिंगवर वाहनचालकांच्या सुविधेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन अंडरपासची निमिती करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून हे काम अत्यंत संथगतीने सुरु असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या सततधार पावसामुळे या अंडरपासमध्ये गुडघ्याभर पाणी साचले आहे. त्यामुळे या कामाप्रती रोष व्यक्त केला जात आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर आज दुपारी बडनेराचे आमदार रवी राणा आणि अमरावती महापालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा यांनी या अंडरपासला भेट देवून पाहणी केली.
यावेळी रवी राणा आणि सौम्या शर्मा यांनी अंडरपासमुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत कंत्राटदार व अभियंत्यांसोबत चर्चा केली. येथे साचलेल्या पाण्याचा तात्काळ निचरा होण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. अंडरपासमध्ये साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा उभारण्याची आवश्यकता असण्यावर आमदार रवी राणा यांनी भर दिला. आधीच अंडरपासचे काम अत्यंत संथगतीने सुरु आहे. या कामाला वेग देण्याची गरज आहे. येथून पावसाचे पाणी बाहेर काढल्यानंतरच पुढील कामाला सुरुवात होउ शकेल. त्यामुळे हे काम पूर्ण होवून अंडरपास नागरिकांसाठी खुला होण्याकरिता आणखी बराच काळ लागणार आहे. अंडरपासचे काम लवकरात लवकर कसे पूर्णत्वास नेता येईल, याद़ृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश आ. रवी राणा आणि मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी संबंधितांना दिले.
यावेळी माजी नगरसेवक डॉ. राजेंद्र तायडे, सुनील काळे, सुमती ढोके, शहर अभियंता रविंद्र पवार, उपायुक्त नरेंद्र वानखडे, महारेलचे अधिकारी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-समन्वयातून काम पूर्ण करावे
नागरिकांच्या सुविधेसाठी शहर रेल्वे फाटक मुक्त करण्याकरिता सरकारने पाउले उचलली आहेत. रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल आणि अंडरपासची निर्मिती करण्यात येत आहे. ही कामे समन्वयातून होणे गरजेचे आहे. रेल्वे प्रशासन आणि कंत्राटदाराने कामे पूर्ण करताना महापालिकेची मदत घेणे आवश्यक असल्याचे मत आमदार रवी राणा यांनी व्यक्त केले. नव्यानेच रुजू झालेल्या महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्या कार्यप्रणालीची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. संपूर्ण शहरात वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देवून शर्मा नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रशासनाला निर्देश देवून उपाययोजना करित आहेत. याबद्दल रवी राणा यांनी समाधान व्यक्त केले.

संबंधित बातम्या

Back to top button