जेवडनगरात मध्यरात्री गुंडांचा तांडव; पाच आरोपी अटकेत
यश कडूच्या अटकेचा विरोध, जोरदार दगडफेक केल्याने परिसरात तनाव

अमरावती /2 डिसेंबर : जेवडनगर परिसरात सोमवारी उशिरा रात्री उसळलेल्या हिंसाचाराने नागरिक अक्षरशः थरथर कापले. जुन्या गुन्ह्याच्या प्रकरणात पोलिसांनी यश कडू या आरोपीला सायंकाळी अटक केली होती. मात्र त्यानंतर रात्री साधारण अकराच्या दरम्यान त्याचे कथित समर्थक चाळीस ते साठ जणांचा गट शस्त्रसदृश वस्तूंसह परिसरात घुसला आणि जवळपास अर्धा तास उच्छाद मांडला. या अचानक झालेल्या हल्ल्याने संपूर्ण जेवडनगर भयभीत झाले. युवकांच्या हातात लोखंडी रॉड, दांडके, लाठ्या आणि मोठमोठे दगड होते. त्यांनी गल्लीबोळांतून धावत वाहनांची मोडतोड सुरू केली. रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकींच्या काचा फोडणे, चारचाकींवर दगडफेक करणे आणि घरांच्या बाहेर ठेवलेल्या वस्तू रस्त्यावर फेकून देणे असे कृत्य त्यांनी सलग केले. त्यांच्या दहशतीत वीसहून अधिक दुचाकी आणि दोन चारचाकींची मोडतोड झाली. काही दुकानांचे शटर आणि फलकही फोडण्यात आले. परिसरात पसरलेल्या आरडाओरडीत महिलांना आणि मुलांना घरातच थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. गोंधळाच्या काळात उपद्रवी युवकांनी गल्लीबोळांत शिवीगाळ करत धमक्या दिल्या. घराबाहेर येऊ नका, असा दबाव टाकत त्यांनी नागरिकांना भयभीत केले. काहींनी दहशतीने घरांची खिडकी-दरवाजे घट्ट लावून घेतले, तर अनेकांनी पोलिस हेल्पलाईनवर फोन करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळताच राजापेठ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांपूर्वीच उपद्रवी पळून गेले होते. परिसरात उध्वस्त झालेली वाहने आणि तुटलेला काचांचा खच असा दृश्य पाहायला मिळत होता. पोलिसांनी तातडीने परिसराचा ताबा घेतला आणि रात्रीच मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवला. घटनास्थळी पाहणी करून अनेक नागरिकांचे जबाब नोंदविण्यात आले. राजापेठ पोलिसांनी चाळीस ते साठ जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. छापेमारीदरम्यान मंगळवार दुपारी पाच जणांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले असून इतर आरोपींच्या शोधासाठी मोहीम सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची मागणी केली आहे. एका आरोपीच्या अटकेनंतर एवढा मोठा हिंसाचार कसा घडला, हा प्रश्न परिसरात उपस्थित केला जात आहे. जेवडनगरात आता तणाव कायम असून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यश कडूच्या अटकेनंतर जेवडनगरात उशिरा रात्री चाळीस-साठ युवकांनी रॉड आणि दांडक्यांसह हिंसाचार केला. वीस दुचाकी, दोन चारचाकी आणि काही दुकाने फोडून अर्धा तास दहशत पसरवण्यात आली. पोलिसांपूर्वीच उपद्रवी पळून गेले. राजापेठ पोलिसांनी गुन्हा नोंदवून पाच जणांना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे.




