जळगावातील सराफा व्यापार्याचे 2 कोटी 11 लाखाचे सोने उडवले
बडनेरा रेल्वे स्थानकावर मोठी घटना

* रविवारी संध्याकाळी हावडा मेलमधील घटना बडनेरा जीआरपी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
अमरावती / 13 ऑक्टोंबर – रविवार, 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता बडनेरा रेल्वे स्थानकावर मोठी खळबळ उडाली, जेव्हा एका चोरट्याने जळगाव (खानदेश) येथील सोन्याच्या व्यापार्याची 2 किलो 89 ग्रॅम सोन्याचे दागिने असलेली बॅग ट्रेनमधून उडवली. घटना उघडकीस आल्यानंतर बडनेरा रेल्वे जीआरपीने आरोपींना पकडण्यासाठी जोरदार तपास सुरू केला आहे. पोलिसांनी रेल्वे स्थानक आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्याचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, जळगाव खानदेश येथील प्रसिद्ध सराफा व्यावसायिक किशोर वर्मा यांचे जळगावमध्ये सोन्या-चांदीचे प्रतिष्ठान आहे. ते अमरावतीसह अनेक शहरांतील व्यापार्यांना दागिने पुरवतात. आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर, 12 ऑक्टोबर रोजी ते अमरावतीला सोनारांकडे दागिण्यांच्या ऑर्डर बुकींगसाठी आले होते. व्यापार्यांना दागिने दाखवून आणि ऑर्डर घेतल्यानंतर, ते संध्याकाळी 6 वाजता हावडा-मुंबई मेलने जळगावला परतण्यासाठी बडनेरा रेल्वे स्थानकावर पोहोचले. त्यांच्या जवळ निळ्या रंगाची बॅग होती, ज्यात 2 कोटी 11 लाख रुपये किमतीचे 2 किलो 89 ग्रॅम सोन्याचे दागिने होते.
स्थानकावर पोहोचल्यावर ते जनरल डब्यात चढले आणि बॅग ठेवून ट्रेनच्या बाथरूमजवळ उभे राहिले. ट्रेन निघण्यापूर्वीच कोणीतरी त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग चोरली. बॅग सापडली नाही हे लक्षात येताच, किशोर वर्मा यांनी तात्काळ जीआरपी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि स्टेशन ऑफिसर उमेश मुंढे यांच्याकडे तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला. प्लॅटफॉर्मसह रेल्वे स्टेशन परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करण्यात आले, तसेच जय हिंद चौक आणि चांदणी चौकातील फुटेजही तपासण्यात आले, परंतु पोलिसांना अद्याप कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही. या घटनेमुळे रेल्वे पोलिस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
* अमरावतीहून आरोपी पाठलाग करत असल्याचा संशय
जळगावचे सराफा व्यापारी किशोर वर्मा अमरावतीला आल्यानंतरच चोरट्यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. व्यापार्यांशी दिवसभर भेटीगाठी घेतल्यानंतर ते बडनेरा रेल्वे स्थानकावर पोहोचले, तेव्हा चोरट्यांनी त्यांच्यावर बारीक नजर ठेवली होती. हावडा-मुंबई मेलच्या जनरल कोचमध्ये चढल्यानंतर किशोर वर्मा वॉश बेसिनजवळ उभे असताना, चोरट्यांनी त्यांच्या 2 किलो 89 ग्रॅम सोन्याचे दागिने — ज्यांची किंमत तब्बल 2 कोटी 11 लाख रुपये होती — अशी बॅग चोरून नेली. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी चोरट्यांचा मागोवा घेण्यासाठी तपास सुरू केला असून, तपास त्या दिशेने वेगाने सुरू आहे.
* आरोपीचा कसुन शोध सुरू
रविवार, 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता हावडा-मुंबई मेलमधून जळगावच्या एका सराफा व्यापार्याची 2 किलो 89 ग्रॅम सोन्याचे दागिने असलेली बॅग अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. व्यापार्याने सायंकाळी 7 वाजता तक्रार दाखल केली असून, जीआरपीने तात्काळ आरोपीचा शोध सुरू केला आहे.
— उमेश मुढे, पोलीस अधिकारी, बडनेरा रेल्वे पोलिस स्टेशन




