दिल्लीमध्ये आज गिरोळकर परिवाराचा राष्ट्रीय सन्मान

कोरोना काळातील सेवा व सामाजिक कार्याचा गौरव

अमरावती/24 नोव्हेंबर – जिल्ह्याचा अभिमान उंचावणारी घटना आज नवी दिल्लीमध्ये घडणार आहे. कोरोना काळात गोर-गरीब आणि गरजू समाजघटकांना केलेल्या अखंड मदतीबद्दल तसेच समाजात सर्वधर्म सौहार्द आणि बंधुभावाचा संदेश देणारा मराठी चित्रपट निर्माण केल्याबद्दल अमरावतीचे समाजसेवक व उद्योजक कैलाश गिरोळकर, सौ. छाया गिरोळकर आणि अभिनेता यश गिरोळकर यांना आज राष्ट्रीय सन्मानाने गौरविण्यात येत आहे. हा कार्यक्रम दुपारी तीन वाजता नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात होणार आहे. संविधान सन्मान दिवसाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गिरोळकर परिवारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल फाऊंडेशनतर्फे राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे डॉ. मनीष गवई यांनी दिली आहे.
या सोहळ्यात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान केला जाणार असून देशभरातील निवडक समाजसेवक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान देणार्‍या व्यक्तिमत्वांचा विशेष गौरव केला जाणार आहे. संविधान दिनानिमित्त दुसर्‍या दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबरला
देखील महाराष्ट्र सदनात राष्ट्रीय संविधान सन्मान दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्येही अमरावती जिल्ह्यात अनेक वर्षे सातत्याने
सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणार्‍या मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे. या सर्व मान्यवरांना राष्ट्रपती भवन दर्शनाची सुवर्णसंधी मिळणार असून त्यामुळे अमरावतीकरांसाठी हा दुहेरी अभिमानाचा दिवस ठरणार आहे. गिरोळकर परिवाराचा राष्ट्रीय स्तरावर होणारा सन्मान योगायोगाने नाही, तर समाजासाठी केलेल्या सातत्यपूर्ण आणि निस्वार्थ कार्याची पावती आहे. कैलाश गिरोळकर यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात कठीण परिस्थितीतून झाली. आर्थिकदृष्ट्या साध्या घरातून आलेले असूनही जिद्द, कष्ट आणि मनात असलेले समाजाप्रतीचे प्रेम यांमुळे त्यांनी सामाजिक कार्याला आयुष्याचे ध्येय मानले. विविध उपक्रम आणि दर्जेदार सामाजिक बांधिलकीमुळे त्यांची ओळख एक समर्पित समाजसेवक म्हणून निर्माण झाली. वाढदिवस जल्लोषात साजरा करण्याऐवजी वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसोबत, अनाथ मुलांसोबत, गरजूंसोबत अन्नदान, वस्त्रदान आणि आनंददान करून आ पला वाढदिवस समाजसेवेला वाहणे हा त्यांचा ठरलेला नियम आहे. त्यांच्या सेवाभावी उपक्रमामुळे अनेक गरीब, उपेक्षित आणि आधाराची गरज असलेल्या कुटुंबांना आधार मिळत आला आहे. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेले कार्य आजही विसरता येणार नाही. अनेक स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी लॉकडाउन आणि संसर्गाच्या भीतीमुळे बाहेर पडणे टाळले, परंतु त्या काळात कैलाश गिरोळकर यांनी मात्र पाऊल मागे घेतले नाही. शहरातील व परिसरातील शेकडो कुटुंबांना त्यांनी अन्नधान्य किट, औषधे, रुग्णांकरिता आवश्यक साहित्य, वृद्ध आणि आजारी व्यक्तींसाठी काळजी साहित्य, तसेच जीवनावश्यक वस्तू वेळेवर उपलब्ध करून दिल्या. कुटुंबातील कमावता सदस्य कामधंदा नसल्याने उपासमारीस सामोरे जाण्याची वेळ आलेल्या अनेक घरांतील चुल पुन्हा पेटली, अनेकांना मानसिक आधार मिळाला, आणि मृतांच्या कुटुंबियांना योग्य आधार व सहकार्य मिळवून देण्यात त्यांचा पुढाकार महत्त्वपूर्ण ठरला. प्रसिद्धीच्या अपेक्षेविना केलेले हे समाजसेवेचे व्रत त्यांच्या सन्मानासाठी सर्वोच्च पुरावा मानला जात आहे.
सामाजिक कार्य अधिक नियोजनबद्ध आणि प्रभावी पद्धतीने सुरु ठेवण्यासाठी कैलाश छाया चॅरिटेबल ट्रस्ट ची स्थापना करण्यात आली. या ट्रस्टद्वारे आरोग्य शिबिरांचे आयोजन, गरीब व विद्यार्थ्यांना मदत, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम, अपंग, विधवा आणि अनाथांसाठी साहाय्य, तसेच वंचित घटकांपर्यंत आवश्यक सुविधा पोहोचवण्याचे कार्य सातत्याने केले जाते. ट्रस्टच्या सेवेमुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला असून अमरावती जिल्ह्यातील महत्वपूर्ण सेवा केंद्र म्हणून या संस्थेने स्थान निर्माण केले आहे. याचबरोबर ते चांदूर रेल्वे येथील चंद्रभागेश्वर मंदिराचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. मंदिराच्या माध्यमातून समाजसेवा केली पाहिजे असा विश्वास ठेवून त्यांनी मंदिर व्यवस्थापनाला फक्त धार्मिक स्थळाच्या चौकटीत न अडकता एक सर्वसमावेशक सेवा केंद्रात रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला आहे. मंदिर परिसरात आयोजित महाप्रसाद उपक्रम, गरीबांसाठी मोफत भोजन, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे आणि सामाजिक प्रबोधन यांसारख्या उपक्रमांचे नेतृत्व त्यांनी केले आहे. देवळाचे दार सर्वांसाठी उघडे असले पाहिजे आणि समाजाला देवदर्शनासोबत मानवतेची शिकवण मिळाली पाहिजे, या विचारातून त्यांनी अनेक उपक्रमांना दिशा दिली.
व्यावसायिक क्षेत्रात देखील त्यांनी नेतृत्व दाखवले आहे. एकता ब्रोकर्स असोसिएशन, अमरावतीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत असून रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणार्‍या व्यावसायिकांच्या समस्या, हक्क आणि मार्गदर्शन यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. व्यावसायिकांना एकत्र आणून सहकार्याचे वातावरण निर्माण करून प्रामाणिक आणि विकासाभिमुख व्यवहार संस्कृती निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.सामाजिक कार्यात गिरोळकर परिवार संपूर्णपणे सहभागी असून स्त्री सक्षमीकरणासाठी सौ. छाया गिरोळकर यांचे योगदान विशेष नमूद करण्यासारखे आहे. महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळाले पाहिजे या उदात्त उद्दिष्टातून सौ. छाया गिरोळकर यांनी महिला बचत गट सुरू केला. आज हा बचत गट 5 हजाराहून अधिक महिलांचा मजबूत समूह बनला आहे. महिलांना बचतीची शिस्त, नोकरी किंवा व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य, लघुउद्योगांत मार्गदर्शन, आत्मविश्वास वाढवणारे प्रशिक्षण अशा अनेक उपक्रमांमुळे या बचत गटाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. महिला सक्षम झाल्यास कुटुंब सक्षम होते आणि कुटुंब सक्षम झाले तर समाजही मजबूत होतो, या भावनेतून त्यांनी सतत प्रयत्न केले आहेत. धर्माच्या नावावर मतभेद निर्माण होतात, द्वेष पसरतो आणि मानवतावाद मागे पडतो, याची जाणीव ठेवून समाजात सौहार्द, ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा या हेतूने गिरोळकर परिवाराने सुल्तान, शंभू, सुबेदार या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. विविध धर्म, जात आणि संस्कृती यांमधील लोक प्रेम, परस्पर आदर आणि मैत्रीतून कसे एकत्र राहू शकतात याचा प्रभावी संदेश या चित्रपटातून देण्यात आला. या चित्रपटात मुख्य भूमिका निभावलेला यश गिरोळकर हा अभिनय व नृत्य क्षेत्रात लहानपणापासून सक्रिय असून महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार त्याला दोन वेळा मिळाला आहे. या चित्रपटाने सामाजिक प्रबोधनाची मोलाची भूमिका बजावून गिरोळकर परिवाराच्या सामाजिक मूल्यांची सातत्याने जाणवणारी छाप पाडली आहे.अशा बहुआयामी सामाजिक आणि सांस्कृतिक सेवेला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, आज नवी दिल्लीतील सन्मान समारंभात गिरोळकर परिवार गौरवित होणार आहे. यामुळे अमरावती जिल्ह्याचा अभिमान उंचावला आहे. समाजातील वंचित घटकांना साथ देणे, महिलांना सक्षम बनवणे, धार्मिक सौहार्दाची भावना जागृत करणे आणि सेवेला सर्वोच्च स्थान देणे ही गेली अनेक वर्षे गिरोळकर परिवाराची ओळख राहिली आहे. हा पुरस्कार त्यांच्या कार्याचा केवळ गौरव नसून समाजातील सेवाभाव, मानवता आणि एकतेचा संदेश मजबूत करणारा आहे. अनेक लोक सामाजिक कार्य करतात, परंतु निस्वार्थ हेतूने, प्रसिद्धीपासून दूर राहून, फक्त उपयोगी पडावे या भावनेतून काम करणार्‍या व्यक्ती दुर्मिळ असतात. गिरोळकर परिवाराचे कार्य अशा दुर्मिळ कर्तृत्वामध्ये गणले जाते. राष्ट्रीय सन्मानाच्या निमित्ताने जिल्ह्यात, राज्यात आणि देशभरात त्यांचा गौरव होत असून, पुढील काळातही त्यांच्याकडून समाजसेवेचेच कार्य सातत्याने चालू राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अमरावतीचा अभिमान उंचावणारा क्षण

कोरोना काळातील मदतकार्य, सातत्यपूर्ण समाजसेवा, महिला सक्षमीकरणासाठी केलेले प्रयत्न आणि सर्वधर्म सौहार्दाचा संदेश देणार्‍या चित्रपट निर्मिती या बहुआयामी कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत आज नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात कैलाश गिरोळकर, सौ. छाया गिरोळकर आणि अभिनेता यश गिरोळकर यांना राष्ट्रीय सन्मान प्रदान केला जात आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सन्मान होत असून सन्मानितांना राष्ट्रपती भवन दर्शनाची संधीही मिळणार आहे. या गौरवामुळे अमरावती आणि विदर्भाचा मान संपूर्ण देशभरात अधिक उंचावला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button