19 वर्षीय युवतीसोबत सामुहिक दुष्कर्म
एकाने केला बलात्कार तर दोघांनी विनयभंग

-आरोपींमध्ये दोन अल्पवयीनांचा समावेश
अमरावती / 29 जुलै : एका 19 वर्षीय युवतीला जबरदस्तीने आपल्या घरात ओढून नेत 20 वर्षीय युवकाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना खोलापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत खेलनागवे-दारापूर या गावात घडली. धक्कादायक बाब अशी की, यावेळी तेथे आलेल्या आरोपीच्या दोन अल्पवयीन मित्रांनीही पिडितेसोबत अश्लिल कृत्य करुन तिचा विनयभंग केला. पोलिसांनी तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
विकास विलास मोरे असे आरोपी युवकाचे नाव आहे. पिडितेने याबाबत दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना 25 जुलैची आहे. सायंकाळी पिडिता दुकानातून वही, पेन खरेदी करुन आपल्या घरी परतत होती. ती विकास मोरे याच्या घरासमोरुन जात असताना विकासने जबरदस्तीने तिला आपल्या घरात ओढले. त्यानंतर त्याने युवतीवर बळजबरीने बलात्कार केला. याचदरम्यान विकासचे दोन अल्पवयीन मित्र तेथे आले. त्यांनीही पिडितेसोबत अश्लिल कृत्य करुन तिचा विनयभंग केला. पिडितेच्या तक्रारीवरुन खोलापूर पोलिसांनी तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.




