शासकिय गोदाम फोडणार्‍या चोरट्यांची टोळी जेरबंद

5 आरोपी गजाआड, ग्रामीण गुन्हे शाखेची कारवाई

अमरावती / 6 जुलै: धामणगाव रेल्वे येथील शासकिय धान्य गोदामाचे कुलूप तोडून सोयाबीनच्या बॅग चोरुन नेणार्‍या टोळीतील 5 जणांना ग्रामीण गुन्हे शाखेने अटक केली आहे. 20 जुलै रोजी दत्तापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. या चोरट्यांनी 87 हजार रुपयांचे सोयाबिन लंपास केले होते.
यासंदर्भात धामणगाव रेल्वे येथील तालुका कृषी अधिकारी गजानन राउत यांनी 23 जुलै रोजी दत्तापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. धामणगाव रेल्वे येथे शासकिय विश्राम गृहाशेजारी शासकिय धान्य गोदाम आहे. 20 जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी या गोदामाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि 87 हजार रुपये किंमतीच्या सोयाबिनच्या 87 बॅग लंपास केल्याचे या तक्रारीत म्हटले होते. पोलिसांनी या गोदामात जावून पंचनामा केला आणि अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली. दरम्यान पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी या प्रकरणाचा समांतर तपास करण्याचे आदेश ग्रामीण गुन्हे शाखेला दिले होेते. त्यानुसार गुन्हे शाखेनेही पोलिस निरिक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरु केला होता.
अशातच या चोरीमध्ये धामणगाव रेल्वे येथील रहिवासी असलेल्या मयुर प्रमोद कांबळे (26) याचा हात असून आपल्या अन्य काही साथीदारांसोबत त्याने ही चोरी केल्याची गोपनिय माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरुन पोलिसांनी तात्काळ मयुर कांबळे याला कॉटन मार्केट चौक, दत्तापूर येथून अटक केली. चौकशीत त्याने आपल्या अन्य चार साथीदारांची नावे सांगितली. पोलिसांनी त्यांनाही लगेच गजाआड केले. या आरोपींमध्ये जितेंद्र जगदेव वानखडे (27, रा. धामणगाव रेल्वे), निलेश अशोक शेंडे (35, रा. आसेगाव, ता. धामणगाव रेल्वे), सचिन सदाशिव राउत (36, रा. धामणगाव रेल्वे) आणि अमन व्यास (रा. दत्तापूर) यांचा समावेश आहे.
या सर्व आरोपींनी धामणगाव रेल्वे शासकिय गोदामातील चोरी प्रकरणात आपला हात असल्याचे कबुल केले. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरी गेलेल्या मालापैकी 1.27 क्विंटल सोयाबीन तसेच गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन मोटरसायकल जप्त केली आहे. उर्वरित माल दत्तापूर येथे विकल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. ही कारवाई गुन्हे शाखेचे निरिक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात उपनिरिक्षक मुलचंद भांबुरकर, अंमलदार अमोल देशमुख, मंगेश लकडे, सचिन मसांगे, दिनेश कनोजिया, प्रशिक वानखडे यांच्या पथकाने दिली. पुढील तपासासाठी सर्व आरोपींना दत्तापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button