जबरी चोरी प्रकरणात 5 जणांची टोळी जेरबंद
भातकुली मार्गावर शनिवारची घटना

-पीकअप वाहनचालकाला लुटले होते
अमरावती / 21 जुलै : शनिवार, 19 जुलै रोजी एका पीकअप वाहनचालकाला भातकुली मार्गावर धाकदपटशा करुन लुटण्यात आले होते. त्यांची 19 हजार रुपयांची रोकड 5 जणांच्या टोळीतील सदस्यांनी जबरीने हिसकावून घेतली होती. याप्रकरणाचा यशस्वी तपास करुन भातकुली पोलिस आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने पाचही आरोपींना गजाआड केले आहे.
फिरोज खान सरफराज खान (28, रा. धर्मारपूरा, चांदुर बाजार) यांनी यासंदर्भात भातकुली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार फिरोज खान हे शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास भाड्याचे पीकअप चारचाही वाहन (क्र. एमएच 27, बीएक्स 1029) ने दर्यापूरहून अमरावतीकडे भातकुली मार्गाने जात होते. पेढी नदीवरील पुलानजीक असलेल्या स्मशानभूमिसमोर ते लघुशंकेसाठी थांबले. त्याचवेळी दोन मोटरसायकलवरुन पाच व्यक्ती तेथे आले. सर्वांनी आपले तोंड रुमाल बांधून झाकले होते. त्यांनी फिरोज खान यांना शिवीगाळ व धाकदपटशा केली आणि जबरदस्तीने त्यांच्याच गाडीत बसले. यावेळी एकाने फिरोज खान यांच्या खिशातील 19 हजार रुपये रोख काढून घेतले. ते चारचाकी वाहनाची चाबी देण्याचा आग्रह करित होते. वाहन पळवून नेण्याच्या बेतात असतानाच मागून अचानक दुसरे वाहन आल्याने घाबरुन चौघांनीही मोटरसायकलने तेथून पळ काढला. ते अमरावतीच्या दिशेने गेले होते.
या प्रकाराने घाबरुन गेलेल्या फिरोज खान यांनी आधी आपले घर गाठले नंतर कुटुंबियांसमवेत भातकुली पोलिस ठाण्यात जावून तक्रार दाखल केली. भातकुली पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेउन पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी गुन्हे शाखेकडेही समांतर तपासाची जबाबदारी दिली. आरोपींचा शोध घेत असताना या घटनेत अरबाज खान एजाज खान (29, रा. गवळीपूरा, अमरावती) आणि सलमान अहमद अकिल अहमद यांचा हात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांना लगेच अटक करण्यात आली. या दोघांनी चौकशीत आपल्या अन्य तीन साथीदारांची नावे सांगितली. पोलिसांनी काही वेळातच त्यांनाही ताब्यात घेतले. या आरोपींमध्ये शाहरुख खान कासम खान (32), शेख जुनेद उर्फ राजा शेख युसूफ (24) आणि अमीन खान आशिक खान (22, सर्व रा. लालखडी, अमरावती) यांचा समावेश आहे. भातकुली पोलिस पुढील तपास करित आहेत.
ही कारवाई गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात तसेच भातकुलीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रविंद्र राजुलवार यांच्या नेतृत्वात पोलिस कर्मचारी सुनील पटेल, प्रशांत यादव, विवेक मोहोड, गौरव पुसदकर, आशिष बांगडे, अशोक सुने यांच्या पथकाने केली.




