बडनेरातील जुन्या वस्तीत गणेश विसर्जन अंधारात

मिरवणुकीदरम्यान चार तास वीजपुरवठा खंडित

-महावितरणच्या हलगर्जीपणावर संताप
-गणेशभक्तांच्या आनंदावर विरजन
बडनेरा / 8 सप्टेंबर : जुन्या वस्तीतील सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन रविवारी (दि. 7 सप्टेंबर) अक्षरशः अंधारात पार पडले. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे परिसरातील वीजपुरवठा तब्बल चार तास खंडित राहिला. विसर्जन मिरवणुकीदरम्यान महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना या अंधारामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला. दरवर्षी प्रकाशमय वातावरणात उत्साहाने होणारा विसर्जन सोहळा यंदा काळोखाच्या छायेत पार पडल्याने नागरिकांत तीव्र नाराजीचे वातावरण होते.
संध्याकाळी विसर्जनाची वेळ होताच महावितरणने अचानक घरगुती तसेच रस्त्यावरील लाईन बंद केल्या. नागरिकांनी वारंवार फोन करून अधिकार्‍यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; मात्र उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली, असा आरोप काही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. मोठे गणपती असल्याने लाईन बंद केली असे कारण देण्यात आले. परंतु प्रत्यक्षात मंडळात मोठ्या मूर्ती नव्हत्याच हे नागरिकांनी स्पष्ट केले. त्यामुळे गणेशभक्तांच्या श्रद्धेशी खेळ केल्याचा आरोपही होत आहे.
दरम्यान, अंधारामुळे विसर्जन मिरवणुकीचा संपूर्ण उत्साह मावळला. ढोल-ताशांच्या गजरात सजवलेल्या रथातून बाप्पा मिरवणुकीस निघाले असतानाच प्रकाशाऐवजी गडद अंधार पसरला. महिलांना व मुलांना रस्त्यावर चालताना अडचणींना सामोरे जावे लागले. गर्दीत ढकलाढकली होण्याचा, अपघात होण्याचा धोका निर्माण झाला. जेष्ठ नागरिकांना ठेच लागण्याच्या घटना घडण्याची शक्यता होती. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही; परंतु भक्तांच्या श्रद्धेला व भावनांना महावितरणच्या हलगर्जीपणाने जबर धक्का दिला.
महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दहा-बारा कर्मचारी घटनास्थळी पाठवले. मात्र वीजपुरवठ्याचा मूळ प्रॉब्लेम महावितरणच्या पातळीवर असल्याने काहीच मार्ग निघाला नाही. अखेरीस गणपती बाप्पाचे विसर्जन अंधाराच्या साम्राज्यात करावे लागले. नागरिकांनी या प्रसंगाला श्रद्धेवर अन्याय असे संबोधत संताप व्यक्त केला. या काळोखात जर कोणतीही दुर्घटना घडली असती तर त्याची जबाबदारी महावितरणच्या अधिकार्‍यांवरच ठरली असती, असे नागरिकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच अशा प्रकारामुळे केवळ गणेशभक्तांचाच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो, असे मत व्यक्त केले. घटनेबाबत चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
-चौकशी व्हावी!
गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी दिव्यांचा झगमगाट हवा असतो. पण आम्हाला अंधारात बाप्पाला निरोप द्यावा लागला. हे अतिशय वेदनादायक वाटले. मुलं अंधारात हरवली तर काय? गर्दीत ढकलाढकली झाली असती तर जबाबदार कोण? महावितरणच्या हलगर्जीपणाने मोठा अपघात घडू शकला असता. आम्ही वेळोवेळी अधिकार्‍यांना फोन केले, पण कोणी दखल घेतली नाही. इतक्या मोठ्या उत्सवाकडे दुर्लक्ष करणे हा भक्तांचा अपमान आहे. या गंभीर प्रकाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई होणे आवश्यक आहे.
-शरद ठोसरे, सामाजिक कार्यकर्ते

संबंधित बातम्या

Back to top button