दरोड्याचा कट गाडगेनगरच्या डीबी पथकाने उधळला
टोळीतील तिघे जेरबंद, दोन फरार

-दोरी, मिर्ची पावडर, दुपट्टा, रॉड जप्त
-पांढरी हनुमान मंदिरानजीक कारवाई
अमरावती / 22 जुलै : कुठेतरी दरोडा टाकण्याचा पाच जणांच्या टोळीचा कट गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने उधळून लावला. पांढरी हनुमान मंदिराच्या मागे दरोड्यासाठी शस्त्र व अन्य साहित्यासह दडून बसलेल्या टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली तर दोघे जण पसार होण्यात यशस्वी ठरले. पोलिसांनी आरोपींकडून लोखंडी रॉड, दोरी, दुपट्टा, मिरची पावडर असे साहित्य जप्त केले.
सूरज उमेश कवाडे (29, कठोरा), याचा भाउ सागर उमेश कवाडे (25) आणि पंकज विनायक बोरखडे (30, शिवर, दर्यापुर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे अन्य दोन साथीदार उमेश उर्फ ओम डोईफोडे (19, शिरजगांव कसबा) आणि आदित्य अनिल सिरसाठ (19, महात्मा फुले नगर) हे दोघे संधी साधून फरार झालेत. गाडगेनगर पोलिसांच्या डीबी स्कॉडचे पथक सोमवारी रात्री उशिरा पांढरी हनुमान मंदिर परिसरात पेट्रोलिंग करित असताना त्यांनी मंदिराच्या मागच्या बाजूस पाहणी केली. तेव्हा हे पाच जण कापडाने तोंड झाकून संशयास्पद स्थितीत दडून बसलेले पोलिसांना दिसले.
हे युवक घातपात घडवून आणण्याच्या तयारीत असल्याचा संशय येताच डीबी स्कॉडने त्यांना ताब्यात घेतले. तिघे पोलिसांच्या तावडीत सापडले मात्र दोघांनी पोलिसांना चकमा देवून तेथून पळ काढला. तीन युवकांची झडती घेतली असता पोलिसांना त्यांच्याजवळ मिरची पावडर, लोखंडी रॉड, दोरी, दुपट्टा असे साहित्य आढळून आले.
ही कारवाई पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त गणेश शिंदे, सहायक आयुक्त अरूण पाटिल यांच्या निर्देशावरुन वरिष्ठ निरीक्षक अतुल वर, निरीक्षक विजया पंधरे, निरीक्षक समाधान वाठोेरे यांच्या मार्गदर्शनात आणि डीबी पथकाचे प्रमुख मनोज मानकर, भारत वानखडे, सहायक उप निरीक्षक जावेद अहमद, काँस्टेबल राजेश गुरेले, नंदकिशोर करोची, महेश शर्मा, रूपेश हटकर यांनी केली.




