मुंबई बॉम्बस्फोटातील चार आरोपींची अमरावती कारागृहातून सुटका

नातेवाईकांसह रात्रीच मुंबईला रवाना

-2015 पासुन होते बंदिस्त
-उच्च न्यायालयाने निर्दोश ठरविले
अमरावती / 22 जुलै : 11 जुलै 2006 रोजी मुंबईत लोकल ट्रेनमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून 189 लोकांचा बळी घेतल्याप्रकरणात 12 आरोपींना काल मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोश ठरविले. त्यापैकी चार आरोपी अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात दहा वर्षांपासून जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. त्यांची न्यायालयाच्या निकालानंतर काल रात्रीच अमरावती कारागृहातून सुटका करण्यात आली. 30 सप्टेंबर 2015 पासून हे आरोपी अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होते. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर आपल्या नातेवाईकांसह लगेच चौघेही मुंबईला रवाना झालेत.
11/7 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अमरावती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आरोपींमध्ये तनवीर अहमद मोहम्मद इब्राहीम अन्सारी, मोहम्मद माजीद मोहम्मद शफी, सोहेल मोहम्मद शेख आणि जमीर अहमद लतीफुर रहेमान शेख यांचा समावेश होता. सत्र न्यायालयाने त्यांना 2015 साली जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 30 सप्टेंबर 2015 रोजी त्यांना अमरावती मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले होते. तेव्हापासून ते याच कारागृहात बंदिवासात होते. 2019 मध्ये त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन आपल्या शिक्षेला आव्हान दिले होते.
अ‍ॅड. तंबोली, अ‍ॅड. युग चौधरी, अ‍ॅड. वहाब खान, अ‍ॅड शाहिद नदीम आणि अमरातीच्या अ‍ॅड. सिमी शेख याप्रकरणात त्यांची उच्च न्यायालयात बाजू मांडत होत्या. या वकिलांकडून सतत पाठपुरावा सुरु होता. दरम्यानच्या काळात अ‍ॅड. सिमी शेख या 2019 ते 2021 पर्यंत या आरोपींची वेळोवेळी भेट घेत होत्या. सोमवारी, 21 जुलै रोजी न्यायालयाने 2006 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील 12 आरोपींना निर्दोष ठरविले आणि त्यांची तात्काळ कारागृहातून मुक्तता करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अमरावतीच्या कारागृहात बंदिस्त असलेल्या या चार आरोपींनाही सोमवारी रात्री कारागृहातून मुक्त करण्यात आले. उच्च न्यायालयाच्या निकालात हे चौघे निर्दोश सुटल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे नातेवाईक अमरावतीला आले होते. सायंकाळी 7.40 वाजता चारही जण कारागृहातून बाहेर येताच त्यांनी त्यांच्या वकिल अ‍ॅड. सिमी शेख यांची भेट घेतली व लगेचच ते मुबंईला रवाना झालेत.
-आमचा कोणताही दोष नाही
आज आम्ही 20 वर्षानंतर सुटलो आहे. आमचा देवावर आणि न्यायालयावर खूप विश्वास आहे. मुंबई बॉम्बस्फोटात आमचा हात नव्हता. आमचा कुठलाही दोष नव्हता. सत्र न्यायालयातूनच आमची सुटका व्हायला पाहिजे होती. ती झाली नाही. पण आता उच्च न्यायालयाने आमचे निर्दोषत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे न्यायाधीश व आमच्या वकिलांचे आभार मानतो. माझ्यावर सीमीसोबत संबंध असल्याचा आरोप होता. परंतू तसे काही नव्हते. ती खूप जुनी घटना आहे. सरकारकडे आमची कुठलीच मागणी नाही, असे निर्दोष सुटलेला सोहेल मोहम्मद शेख यावेळी म्हणाला.

संबंधित बातम्या

Back to top button