माजी आमदार राजकुमार पटेल पुत्रासह काँग्रेसमध्ये
मेळघाटच्या राजकारणाला कलाटणी

-प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी केले स्वागत
अमरावती / 17 सप्टेंबर : मेळघाटच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा बदल घडला आहे. माजी आमदार राजकुमार पटेल यांनी आपले पुत्र व धारणी बाजार समितीचे सभापती रोहित पटेल व शेकडो समर्थकांसह आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. स्थानिक मालटेकडीजवळील काँग्रेस भवनात झालेल्या कार्यक्रमात पक्षाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचे स्वागत केले.
गेल्या तीन दशकांत बसपापासून राष्ट्रवादी, भाजप व प्रहार पक्षाचा प्रवास केल्यानंतर पटेलांनी काँग्रेसची निवड केली. मेळघाटमधील विद्यमान भाजप आमदार केवलराम काले मूळचे काँग्रेसमधून आलेले असल्याने पक्षाकडे मोठा चेहरा नव्हता. पटेल यांच्या पुनरागमनामुळे काँग्रेसला ही कमतरता भरून निघाली आहे. कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह खासदार बळवंत वानखेडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, डॉ. सुनील देशमुख, माजी आमदार प्रा. विरेंद्र जगताप, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, शहराध्यक्ष बबलू शेखावत, ग्रामीण जिलाध्यक्ष बबलू देशमुख उपस्थित होते. काँग्रेस नेत्यांनी आज मेळघाटचा शेर काँग्रेसमध्ये आला असे सांगत पटेलांच्या प्रवेशाचे स्वागत केले.
प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले, पटेल पिता-पुत्र यांच्या प्रवेशामुळे मेळघाटच्या आदिवासींच्या न्यायाच्या लढ्याला नवे बळ मिळेल. भाजपा आदिवासींना वनवासी ठरवून त्यांची जमीन हिसकावते, तर काँग्रेस त्यांना देशाचे मूळनिवासी मानते. या प्रवेशामुळे आदिवासीबहुल मेळघाटात काँग्रेसला पुन्हा जोश मिळणार असून, आगामी निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
-घरवापसी म्हणून भावुक
काँग्रेस प्रवेशावेळी राजकुमार पटेल भावुक झाले. हा क्षण त्यांनी खरी घरवापसी असल्याचे सांगितले. मेळघाटचे पहिले आदिवासी आमदार व माजी मंत्री स्व. दयाराम पटेल यांची आठवण त्यांनी जागवली. 1974 मध्ये अचलपुरातील सभेदरम्यान तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांच्या मातोश्रींना मंचावर बसवले होते, ही आठवणही त्यांनी शेअर केली.




