भाजपचे माजी नगरसेवक डॉ. प्रणय कुलकर्णी यांचे निधन

अमरावती / 29 जुलै : अमरावतीच्या राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे, मनपा सभागृहात अभ्यासू आणि मुद्देसूद भूमिका घेणारे, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी माजी नगरसेवक डॉ. प्रणय कुलकर्णी यांचे आज मंगळवार, 29 जुलै रोजी दुपारी दुःखद निधन झाले. वयाच्या अवघ्या 58 व्या वर्षी त्यांचे आकस्मिक निधन झाल्याने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
डॉ. कुलकर्णी यांना काही दिवसांपूर्वी ब्रेन हॅमरेज व हृदयविकाराचा झटका आला होता. सुरुवातीला त्यांच्यावर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीत फारसा सुधार न झाल्याने त्यांना अमरावतीच्या रिम्स रुग्णालयात हलविण्यात आले होते. आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भाजपच्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले डॉ. कुलकर्णी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक आणि विश्वासू शिलेदार मानले जात होते. त्यांच्या या जवळिकीतूनच त्यांना मनपा मध्ये भाजपच्या कोट्यातून स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात आली होती.
सभागृहात त्यांनी अनेक वेळा मुद्देसूद भाषणे करत स्थानिक प्रश्न मांडले होते. सार्वजनिक आरोग्य, नागरी सुविधा आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर त्यांची भक्कम मते आणि प्रगल्भ दृष्टिकोन नेहमीच चर्चेचा विषय ठरला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच भाजपच्या पदाधिकार्‍यांत आणि कार्यकर्त्यांत शोककळा पसरली. अनेकांनी रिम्स रुग्णालयात धाव घेतली. शहरातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.
डॉ. कुलकर्णी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, विवाहित मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा बुधवार, 30 जुलै रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या मांगीलाल प्लॉट, कॅम्प परिसरातील निवासस्थानाहून निघणार असून, हिंदू मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button