आचारसंहितेत मजीप्राची जबरी वसुली!
अधिकृत आदेशांशिवाय कारवाई

* इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा संताप
अंजनगाव सुर्जी/ 12 नोव्हेंबर – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान लागू असलेल्या आचारसंहितेच्या काळात शासकीय यंत्रणांनी निष्पक्षता राखणे अपेक्षित असते. मात्र या काळातच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने कोणतेही अधिकृत आदेश नसताना उमेदवारांकडून जबरी वसुली सुरू केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यासंदर्भात कोणतेही निर्देश नसतानाही प्राधिकरणाने स्वतःच्या पातळीवर वसुलीचे आदेश जारी केले आहेत. या कारवाईमुळे इच्छुक उमेदवार आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, आचारसंहितेच्या काळात शासनाच्या अधिपत्याखालील विभागांनी अशा प्रकारे आर्थिक वसुली करणे ही निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गदा आणणारी बाब आहे, अशी प्रतिक्रिया उमेदवारांकडून दिली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्व शासकीय विभागांनी कोणतीही आर्थिक वसुली, मंजुरी अथवा नवे आदेश काढणे टाळणे अपेक्षित असते. तथापि, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने उमेदवारांकडून जबरदस्तीने थकबाकी वसुली सुरू केल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यामुळे उमेदवारांवर आर्थिक ताण तर वाढलाच, परंतु प्रशासनाच्या निष्पक्षतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अंजनगाव सुर्जी येथील जीवन प्राधिकरण प्रशासन शुद्ध पाणीपुरवठा होत असल्याचा दावा करते; मात्र प्रत्यक्षात नागरिकांना वारंवार अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे की, शुद्ध पाणीपुरवठ्याबाबत तक्रारींवर दुर्लक्ष करून प्राधिकरण अधिकारी वसुलीला प्राधान्य देत आहेत. नागरिकांकडून तसेच स्थानिक जनप्रतिनिधींकडून या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप नोंदविण्यात आला आहे. या घटनेने स्थानिक राजकीय वर्तुळातही चांगलीच खळबळ माजली आहे. अनेक संभाव्य उमेदवारांनी विभागाच्या या वागणुकीवर आक्षेप नोंदवत, निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल करण्याची तयारी दाखवली आहे. काही कार्यकर्त्यांनी हे आचारसंहितेचे उल्लंघन आणि प्रशासनाचा दुरुपयोग असल्याचा आरोप केला आहे. आता या प्रकरणी निवडणूक आयोग कोणती भूमिका घेतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. जर आयोगाने या वसुलीला आचारसंहितेचे उल्लंघन ठरवले, तर संबंधित अधिकार्यांवर कारवाईची शक्यता नाकारता येत नाही.




