जिल्ह्यात शिंदे गटाचे पाच निवडणूक प्रचारक नियुक्त
प्रीती बंड आणि जगदीश गुप्ता यांच्यावर पक्षाचा सर्वाधिक विश्वास

* नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी निवडणुकीची धुरा
अमरावती /13 नोव्हेंबर – अमरावती जिल्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाच्या शिवसेनेने निवडणुकीची रणशिंग फुंकली आहे. पक्षाने जिल्यातील दहा नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी पाच अनुभवी आणि प्रभावी नेत्यांवर निवडणूक प्रभार्यांची जबाबदारी सोपवून प्रचार मोहिमेला जोरदार सुरुवात केली आहे. ही धुरा माजी मंत्री जगदीश गुप्ता, माजी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे, माजी आमदार अभिजित अडसुळ, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील आणि शिवसेना उपनेत्या प्रीती बंड या पाच वरिष्ठ नेत्यांकडे सोपवण्यात आली आहे. या नेमणुकांनंतर अमरावती जिल्यातील शिंदे गटाची संघटनशक्ती नव्या जोमाने उभी राहत आहे. पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आगामी निवडणुकांसाठी सज्ज झाले असून, शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नगरपरिषदेत शिंदे गटाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी रणनिती आखली जात आहे. कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केल्यास जिल्ह्यात शिंदे गटाची शिवसेना पुन्हा आपले बळ दाखवेल, असा विश्वास पक्षातील वरिष्ठांनी व्यक्त केला आहे. हे सर्व नेते आता आपल्या-आपल्या कार्यक्षेत्रात उतरून पक्षाची ताकद संघटित करत आहेत. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद, उमेदवार निवड, प्रचार आराखडा, आणि जनसंपर्क मोहिमेची आखणी यासाठी सज्जता सुरू झाली आहे.
जबाबदारींचे क्षेत्रवार वाटप
अभिजित अडसूल आणि प्रीती बंड – अंजनगाव सुर्जी व दर्यापूर नगरपरिषद प्रीती बंड आणि ज्ञानेश्वर धाने पाटील – अचलपूर, वरूड, मोर्शी आणि शेंदूरजना घाट नगरपरिषद
जगदीश गुप्ता – चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, चिखलदरा नगरपरिषद आणि धारणी नगरपंचायतप्रा. श्रीकांत देशपांडे – धामणगाव रेल्वे नगरपरिषद आणि नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत.
प्रीती बंड आणि जगदीश गुप्ता यांच्या मदतीला दिग्गज शिलेदार
या यादीत प्रीती बंड आणि जगदीश गुप्ता यांच्यावर पक्षाने सर्वाधिक विश्वास दाखविला आहे. प्रीती बंड यांच्या जबाबदारीत तब्बल सहा नगरपरिषदांचा कारभार असून त्या अभिजित अडसूल व ज्ञानेश्वर धाने पाटील यांच्या सोबत विविध ठिकाणी समन्वय साधणार आहेत. तर जगदीश गुप्ता यांच्या अखत्यारीत तीन नगरपरिषद आणि एक नगरपंचायत असून, त्यांनी आधीच आपले कार्यकर्ते मैदानात उतरवले आहेत.




