लेआऊटवर पहिला ’शिक्का’ लाखमोलाचा; दोन अटकेत
अमरावती नगर रचना विभागात अँटी करप्शनचा छापा

* नगररचनाकार तुषार नंद व गौरव भगतला बेड्या
अमरावती / 10 मार्च : भ्रष्टाचाराने पोखरलेल्या शासकीय यंत्रणेला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठा दणका दिला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अगदी पाठीमागे असलेल्या सहाय्यक संचालक नगर रचना व मूल्य निर्धारण कार्यालयात आज दुपारी ’एसीबी’च्या पथकाने धाडसी कारवाई करत दोन लाचखोर अधिकार्यांना रंगेहाथ दबोचले. लेआऊटच्या नकाशावर पहिला शिक्का मारण्याच्या बदल्यात चक्क 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना नगररचनाकार तुषार अमित नंद आणि सहाय्यक नगररचनाकार गौरव अरुण भगत यांना पोलिसांनी भर कार्यालयात घेरले. या धडक कारवाईमुळे महसूल आणि नगर रचना वर्तुळात एकच खळबळ उडाली असून भ्रष्ट अधिकार्यांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एका तक्रारदाराने आपल्या लेआऊटच्या कामासाठी नगर रचना विभागाकडे रीतसर अर्ज केला होता. मात्र, नियमात असलेल्या कामासाठीही या दोन्ही अधिकार्यांनी पैशांची हाव धरली होती. लेआऊटवर पहिला शिक्का मारण्यासाठी 1 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. तक्रारदाराने या जाचाला कंटाळून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे दार ठोठावले. तक्रारीची खातरजमा होताच पोलीस उपअधीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. आज दुपारी जैसेच तक्रारदाराने 1 लाखाची रोकड या दोघांच्या स्वाधीन केली, तसे दबा धरून बसलेल्या पथकाने झडप घातली. पोलीस निरीक्षक फड, पीएसआय सतीश किटुकले, पोलीस कर्मचारी युवराज राठोड आणि वैभव जायले यांच्या पथकाने या दोन्ही ’पांढरपेशा’ लाचखोरांना रंगेहाथ पकडून त्यांची रवानगी एसीबी कार्यालयात केली. या कारवाईनंतर संपूर्ण कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली असून, या प्रकरणाचे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कार्यालयात पडली ’एसीबी’ची गाज-नगर रचना विभागातील या मोठ्या कारवाईने भ्रष्टाचाराचा नवा चेहरा समोर आला आहे. एसीबीच्या या धाडसी मोहिमेमुळे शासकीय कार्यालयातील ’कमिशन’ संस्कृतीला मोठा दणका बसला असून, लाचखोर अधिकार्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.




