विदर्भात ‘बार-टेल्ड गॉडविट’ची प्रथम नोंद; पक्षीविश्वात खळबळ

अमरावतीत दुर्मिळ पाहुण्याचे आगमन

अमरावती /9 डिसेंबर : जिल्ह्याला एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनवत जगातील सर्वाधिक लांब पल्ल्याचे अखंडित उड्डाण करणारा दुर्लभ बार-टेल्ड गॉडविट हा पक्षी प्रथमच विदर्भात अवतरला आहे. नांदगावपेठजवळील बोर बांध आणि अमरावती विद्यापीठ परिसरातील तलावांवर या परदेशी पाहुण्याची झालेली अनपेक्षित चाहूल पक्षीप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह निर्माण करणारी ठरली आहे.
सायबेरिया, अलास्का आणि विस्तीर्ण टुंड्रा पट्ट्यात वावरणारा हा पक्षी सहसा समुद्रकिनार्‍याच्या ओलसर वातावरणात दिसतो. भारतात तो प्रामुख्याने मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर दिसून येत असताना विदर्भात त्याचे आगमन ही अत्यंत दुर्मिळ घटना मानली जात आहे. त्यामुळे या नोंदीने पक्षी अभ्यासकांचे लक्ष पुन्हा एकदा अमरावतीकडे वेधून घेतले आहे.
समुद्रकिनार्‍याचा रहिवासी अचानक अंतर्भागात ‘बार-टेल्ड गॉडविट’ शरीराने सडपातळ, पाय लांब आणि चोच थोडीशी वर वळलेली अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेला पक्षी आहे. शेपटीवर असलेल्या आडव्या पट्ट्यांमुळे त्याला ‘बार-टेल्ड’ अशी ओळख मिळाली. या परदेशी पाहुण्याची लांबी साधारण 37 ते 41 सेंमी, पंखांचा फैलाव 70 ते 80 सेंमी आणि वजन 250 ते 600 ग्रॅमदरम्यान असते. नर पक्षी दिसायला अधिक रंगतदार आणि आकर्षक असल्याने त्यांचे नैसर्गिक रूप विशेष उठून दिसते.समुद्रकिनार्‍यावरील ओलसर गाळात आपली लांब चोच खुपसून कीटक, जंत, शंख-शिंपले शोधत खाणे हे त्याचे दैनंदिन आहारचक्र. अमरावतीच्या तलावांवर त्याची उपस्थिती दिसल्याने येथे उपलब्ध अन्नसंपत्ती व जलसाठ्याची गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे, असे अभ्यासकांचे मत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button