केतकी कास्तगार फाऊंडेशन संस्थाध्यक्षाची आर्थिक फसवणूक

शासकीय अधिकार्‍यांशी जवळचे संबंध असल्याची बतावणी करुन

वरुड । 23 सप्टेंबर – मंत्रालय तसेच इतर वरीष्ठ शासकीय अधिकार्‍यांशी अत्यंत जवळचे संबंध असल्याची बतावणी करून जास्तीत जास्त निधी मिळवून देतो, असे दाखवून केतकी कास्तगार फाउंडेशन संस्था अध्यक्षाची तब्बल 4 लाख रुपयांनी आर्थिक फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल ज्ञानेश्वर साबळे (वय 34, रा. शकुंतला विहार जवळ, वरुड, ता. वरुड) हे केतकी कास्तगार फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष असून ते वरुडमध्ये ही संस्था राबवितात. या संस्थेद्वारे फिर्यादी अमोल ग्रामीण भागातील कास्तकार, शेतकरी, गरीब व वंचित घटकांसाठी शेतकर्‍यांना सेंद्रिय शेती, नैसर्गिक खताचे प्रशिक्षण, सरकारी योजनांचे मार्गदर्शन, आरोग्य तपासणी शिबीर, महिला सक्षमीकरण व शिक्षण यासंबंधी अनेक उपक्रम राबवितात.

फिर्यादी अमोलची ओळख आरोपी प्रविण बाबुराव पेडडावाड (वय 34, रा. नळगीर, ता. लोहारा, जि. लातुर) आणि त्यांच्या मित्र निलेश जोशी, रा. नागपूर यांच्याद्वारे झाली होती. नमूद घटनावेळी व ठिकाणी आरोपी प्रविण याने फिर्यादी अमोलला सांगितले की, “माझे मंत्रालय तसेच इतर वरीष्ठ शासकीय अधिकार्‍यांशी अत्यंत जवळचे संबंध आहेत, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त निधी मिळवून देतो,” असे सांगून त्याचा विश्वास जिंकला. यावरून फिर्यादी अमोलने आरोपी प्रविणला नगदी 20 हजार रुपये आणि 3 लाख 80 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून एकूण 4 लाख रुपये दिले. अनेक दिवस उलटूनही अमोलला कोणताही निधी मिळाला नाही तसेच आरोपी प्रविणने दिलेले आश्वासन व कागदपत्रे बनावट असल्याचे लक्षात आले.

नमूद आरोपी प्रविणने फिर्यादी अमोल कडून 4 लाख रुपये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फसवणूक करून घेतले आणि अमोलचा विश्वासघात केला आहे. या प्रकरणी फिर्यादी अमोल ज्ञानेश्वर साबळे यांच्या तक्रारीवरून वरुड पोलिसांनी आरोपी प्रविण बाबुराव पेडडावाड विरुद्ध भादंवि कलम 318 (4), 316 (2), 351 (2) भा.न्या.सं. 2023 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरुड पोलिस करत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button