बडनेरात महिला शिक्षिकेची गळफास घेवुन आत्महत्या
नवी वस्ती परीसरातील घटना

अमरावती /26 ऑक्टोबर – शहरातील एका महाविद्यालयात कार्यरत असलेल्या अविवाहीत 26 वर्षीय महिला शिक्षिकेने आपल्या राहत्या घरी नवी वस्ती, बडनेरा येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी सदर घटना उघडकीस आली. सदर महिलेने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. मृतक महिलेचे नाव रणदीप कौर रियाडा असे आहे. ती बडनेरा शहरातील नवी वस्ती, लकडगंज परिसरात वास्तव्यास आहे. प्राप्त माहितीनुसार रणदीप कौर ही महिला बडनेरा येथील एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये कार्यरत होती. कालांतराने सदर महिला तखतमल हायस्कुलमध्ये नोकरीवर लागली होती. तिच्या पश्चात एक छोटी बहीण व दोन लहान भाऊ आहेत. घटना घडली त्यावेळी तिचे आईवडील मुंबई येथे गेले होते. त्यांच्यासोबत एक मुलगाही गेला होता. लहान 16 वर्षीय भाऊ रणदीप कौरजवळच होता. शनिवारी रात्री दोघे बहीण-भाऊ घरामध्ये झोपले होते. रविवारी सकाळी रणदीप कौरचा भाऊ उठला असता त्याला त्याची बहीण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. ही घटना पाहून भयभीत झालेल्या भावाने त्वरित शेजाऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर बडनेरा पोलिसांना माहिती दिली असता पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. सदर घटनेची माहिती मृतकाच्या आईवडिलांना देण्यात आली असून ते सोमवारी, 27 ऑक्टोबर रोजी मुंबईहून बडनेरा येथे येत आहेत. यानंतर पोलीस पुढील प्रक्रिया पूर्ण करतील. सध्या रणदीप कौर हिने आत्महत्या का केली हे समजू शकले नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील चौकशी करीत आहेत.




