बेलपुर्‍यात पिता-पुत्रावर चाकूने प्राणघातक हल्ला

दोघेही गंभीर जखमी, परिसरात तणाव

-शेजार्‍यांच्या भांडणात मध्यस्थी भोवली
-एक आरोपी अटकेत, तिघांचा शोध सुरू
अमरावती / 15 सप्टेंबर : शहरातील बेलपुरा परिसरात रात्री उशिरा शेजार्‍यांच्या वादात मध्यस्थी करणे बाप-लेकाला चांगलेच महागात पडले. परिसरातील चौघा आरोपींनी धारदार चाकूने पन्ना छोटेलाल कुरील (44) व त्याचा मुलगा आदित्य पन्ना कुरील (17) यांच्यावर जीव घेण्याच्या उद्देशाने हल्ला करत गंभीर जखमी केले. घटनेनंतर दोघांनाही तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
राजापेठ पोलीस ठाण्यात आरोपी बबलू चौधरी (38), नितीन चौधरी (35), रितिक चौधरी (27) व साहिल चौधरी (20, सर्व रा. बेलपुरा) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, बबलू चौधरीला अटक करण्यात आली आहे. उर्वरित तिघा आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. घटनेविषयी मिळालेल्या माहितीनुसार, पन्ना कुरील हा एका हॉटेलमध्ये अचारी म्हणून काम करतो. बेलपुरातील संत रविदास समाज मंदिराशेजारी तो पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास आहे. 14 सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास त्याच्या शेजारील मूर्तिकार छोटू रावत व दिनेश व राजेश चौधरी या भावामध्ये मूर्ती निर्मितीच्या कामादरम्यान उडणार्‍या धुळीवरून वाद सुरू होता. हा गोंधळ ऐकून पन्ना कुरील वाद शमविण्यास गेला. मात्र मध्यस्थी करण्याच्या प्रयत्नातच आरोपी बबलू चौधरीने त्याला शिवीगाळ करत चाकूने पोटाजवळ व मांडीवर वार केले. त्यादरम्यान नितिन व रितिक चौधरी यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
स्वतःच्या वडिलांवर हल्ला झाल्याचे पाहून त्याचा पुत्र आदित्य कुरील वडिलांना वाचविण्यास धावला असता, रितिक व साहिल चौधरी या दोघांनी त्याच्या पोटावर देखील चाकूने जोरदार वार केला. त्यामुळे तोही गंभीर जखमी झाला. या हल्ल्यानंतर चारही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व जखमींना रुग्णालयात हलविले. त्यानंतर चौघांविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 109, 352, 115(2) व 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. बबलू चौधरीला ताब्यात घेण्यात आले असून इतर तिघा आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button