गाडगेनगरात युवकावर प्राणघातक हल्ला
कोयता आणि चाकूने वार

-चीअर्स बार शेजारी घटना
-दोघे आरोपी फरार
अमरावती / 9 सप्टेंबर : गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चीअर्स बारच्या शेजारील विजय चायनीजजवळ एका 27 वर्षीय युवकावर दोन आरोपींनी कोयता व चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. पीडित युवकाच्या नातेवाईकाच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला आहे.
सोमवार, दिनांक 8 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास जयसियाराम नगरातील रहिवासी अमित उज्वल मनोहर (वय 27) आपल्या मित्रांसह चीअर्स बारच्या शेजारी विजय चायनीज येथे बसला होता. यावेळी भारत उर्फ मक्खी अर्जुन घुगे व अभिजित जाधव हे दोघे तेथे आले. दोघा आरोपींनी अमित मनोहर याच्याशी किरकोळ कारणावरून वाद घालत आणि त्याच्यावर कोयता व चाकूने जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात अमित गंभीर जखमी झाला. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले.
अमित मनोहर यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, गाडगेनगर पोलिसांनी आरोपी भारत उर्फ मक्खी अर्जुन घुगे व अभिजित जाधव यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 109 (1), 3 (5) अंतर्गत खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजपूत करीत आहेत.




