सोलर कंपनी विरोधात शेतकर्यांचे जलसमाधी आंदोलन
धानोरा कोकाटे येथील शेतकर्यांचा ग्रामपंचायत व सोलर कंपनी विरुद्ध रोष

तिवसा /23 सटेंबर : अमरावती तालुक्यातील धानोरा कोकाटे येथे गेल्या तीन वर्षांपासून रिन्यूसन प्रायव्हेट लिमिटेड सोलर कंपनीचे गावात काम सुरू आहे. गावाच्या मुख्य रस्त्यापासून ते कंपनीपर्यंत रोडचे काम करण्यात आले असताना शेतकर्यांना विचारात न घेतल्यामुळे कंपनीच्या कामामुळे येथील शेतकर्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानभरपाईसह विविध मागण्यांसाठी आज रिन्यूसन कंपनी व ग्रामपंचायतच्या विरोधात शेकडो शेतकर्यांनी तलावात उतरून जलसमाधी आंदोलन केले. यावेळी शेतकर्यांनी सोलर कंपनी व ग्रामपंचायत विरोधात जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त केला. येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते गुरुदत्त रामदास कोकाटे यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर 22 तारखेला अन्नत्याग उपोषण सुरू केले. या अन्नत्याग उपोषणात उपोषणकर्त्यांकडून शेतीचे नुकसान भरपाई, बांध बंदिस्त दुरुस्त करून देणे, विनापरवानगी केलेले पूल पाडणे, गावासाठी दरवर्षी सीएसआर फंडातून विकासात्मक काम करणे, तलावावरील अतिक्रमण हटविणे, तलावात विनापरवानगी टाकलेले पोल हटवणे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. याच अन्नत्याग उपोषणाला पाठिंबा म्हणून आज धानोरा कोकाटे येथील दिग्रस तलावात उतरून शेतकर्यांनी जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनात सौरभ कोहळे, वासुदेव, किशोर बायस्कर, रुपचंद वरखडे, निलेश चौधरी, नितेश पंधरे, प्रतीक उईके, अजिंक्य चौधरी, निलेश चोपडे, ऋत्विक चौधरी, सुशील वरघट, योगेश घोगरे, चेतन भुयार, स्वप्नील भुयार, बाबाराव चोपडे, सुभाष चौधरी, दिलीप कोकाटे, विनोद चौधरी, शुभम देशमुख, महेंद्र वरघट, हरिश्चंद्र पतींगे, बापूराव नेवारे, रामेश्वर भाकरे, जयकुमार वरघट, जितेंद्र वरखडे, अनिकेत भोपळे आदी शेतकरी सहभागी झाले आहेत.




