नवीन वाणांनी शेतकर्‍यांची फसवणूक; जुने ‘एच-4’, ‘जयधारा’ वाण आजही

दोन वेच्यातच उलंगवाडी

चिंचोली गवळी/27 ऑक्टोबर – मोर्शी तालुक्यात कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु सध्याच्या हंगामात बोंडअळी आली की नाही, पण सिटी वाजली अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. नवीन वाणांच्या मोहात शेतकरी अडकले, पण प्रत्यक्षात या व्हरायटींनी उत्पादनात मोठी घट घडवून आणली आहे. सध्या तालुक्यातील अनेक भागात कपाशीची झाडे केवळ दोन वेचांपर्यंतच मर्यादित राहिली आहेत. एकरी चार ते पाच क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन घेणे कठीण झाले आहे, असे स्थानिक शेतकरी सांगतात. काही ठिकाणी कपाशीला लाल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसतो, तर काही ठिकाणी बोंडे लागूनही त्यांची वाढ खुंटल्याचे दिसते. नवीन वाणांच्या जाहिरातींमध्ये बोंडअळी लागत नाही, स्वयंचलित पिक तयार होते अशा दाव्यांनी शेतकऱ्यांना आकर्षित केले, पण प्रत्यक्षात परिस्थिती उलटीच ठरली. झाडे वाढल्यानंतर पाने सुद्धा जनावरांना खाण्याजोगी राहत नाहीत. काही ठिकाणी तर झाडे पूर्ण कोरडी पडून राहतात. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असून पूर्वीच्या जुन्या वाणांची आठवण आज अधिक तीव्रतेने येते, असे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

1985 ते 1995 या काळात मोर्शी आणि विदर्भ भागात प्रामुख्याने ‘एच-4’, ‘जयधारा’, ‘व्ही-797’, ‘एनएच-44’, ‘पीकेव्ही-वन’ आणि ‘एलआरए-5166’ या वाणांना मोठी मागणी होती. त्या काळातील कपाशीला उत्कृष्ट तंतू, मध्यम कालावधीचे पीक आणि स्थानिक हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता होती. विशेष म्हणजे, या वाणांमध्ये कमी पावसातसुद्धा चांगले उत्पादन मिळायचे. त्या काळातील कपाशी मार्च-एप्रिलपर्यंत हिरवीगार टिकून राहायची. एप्रिल महिन्यात उशीरा वेचलेली कपाशी बाजारात मेघनीजची कपाशी म्हणून ओळखली जायची. घराघरात मेघनीजची कपाशी ही नेहमी साठवली जायची. त्यापासून गाद्या, उशा तयार होत आणि नातेवाईकांमध्येही याची देवाणघेवाण होत असे. आजच्या पिढीला ‘मेघनीजची कपाशी’ म्हणजे काय, हेच विसरण्याची वेळ आली आहे. त्या काळात फवारणी व खतांचा खर्चही मर्यादित होता. सेंद्रिय खतांचा वापर करून शेतकरी उत्तम उत्पादन घेत असत. पिक हिरवे राहिल्यामुळे जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध होत असे.

परंतु आजच्या सुधारित वाणांमध्ये हिरवाईचा गुणच उरलेला नाही. पिक संपले की झाडे कोरडी पडतात, पाने जनावरांना न खाता येण्याजोगी होतात. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, नवीन वाणांनी आमची आर्थिक हानी केली. फवारणीचा खर्च वाढला, उत्पादन घटले आणि जनावरांनाही चारा मिळेनासा झाला. काहींच्या मते, शासनाने आता पुन्हा एकदा जुन्या, सेंद्रिय व स्थानिक हवामानाशी जुळणार्‍या कपाशी वाणांकडे लक्ष द्यावे. “जुनं ते सोनं” ही म्हण कपाशीच्या बाबतीत अक्षरशः खरी ठरते, असे शेतकरी आवर्जून सांगतात. आज या वाणांची बी-बियाणे मिळणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी जुने वाण मिळाले तरी त्यांची गुणवत्ता खात्रीशीर नसते. त्यामुळे जुने वाण परत उपलब्ध होतील का, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

संबंधित बातम्या

Back to top button