भरधाव मालवाहू वाहनाने कुटुंबाला चिरडले, 3 गंभीर

कोंडेश्वर रस्त्यावर मध्यरात्री भीषण अपघात

बडनेरा / 27 फेब्रुवारी – स्थानिक कोंडेश्वर रस्त्यावरील एका विटांच्या भट्टीवर रोजगारासाठी आलेल्या धारणीतील मजूर कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. 25 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास आपल्या झोपडीबाहेर गाढ झोपेत असलेल्या धांडे कुटुंबाला एका बेफाम वेगाने येणार्‍या मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पती, पत्नी आणि त्यांची 10 वर्षांची निष्पाप मुलगी असे तिघेही गंभीर जखमी झाले असून, चिमुकल्या संगीताचा पाय निकामी झाला आहे. अपघातानंतर माणुसकीला काळिमा फासत वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अमरावती जवळील बडनेरा शहरात मन हेलावून टाकणारी ही घटना घडली आहे. जुनी वस्ती येथील बारीपुरा निवासी मोहन सूर्यभान दारोकार यांची कोंडेश्वर रस्त्यावर विटांची भट्टी आहे. या ठिकाणी धारणी तालुक्यातील धापला गावातील मजूर कुटुंबीय पोटाची खळगी भरण्यासाठी काम करतात. नेहमीप्रमाणे दिवसभराचे कष्ट उपसून सोमा किसन धांडे (वय 55 वर्षे), लीला सोमा धांडे (वय 50 वर्षे) आणि त्यांची मुलगी संगीता सोमा धांडे (वय 10 वर्षे) हे सर्वजण आपल्या झोपडीच्या बाहेर मोकळ्या जागेत झोपलेले होते. रात्री 1 च्या सुमारास काळ बनून आलेल्या एमएच 31 एपी 2740 क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने या निद्राधीन कुटुंबाला अक्षरशः उडवले. ही धडक इतकी भीषण होती की, तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. या दुर्घटनेत 10 वर्षीय चिमुकल्या संगीताचा पाय गंभीररित्या फ्रॅक्चर झाला असून तिला कायमचे अपंगत्व येण्याची भीती व्यक्त होत आहे. जखमींना तातडीने अमरावती येथील पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विटभट्टी मालक मोहन दारोकार यांनी दिलेल्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास अधिकारी सचिन माकोडे या फरार वाहनचालकाचा शोध घेत असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button