शहरात डिजिटल लॅब व वेलनेस सेंटर स्थापन करा
भाजप शहराध्यक्ष नितीन धांडेंची मागणी

-मनपा आयुक्त सौम्या शर्मांशी चर्चा
-सीसीटीव्ही लावण्याचाही आग्रह
अमरावती / 4 जुलै: भारतीय जनता पक्षाचे अमरावती शहर-जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी आज महापालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी धांडे यांनी शहरातील ज्वलंत प्रश्नांबाबत आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली. स्वच्छतेसारख्या समस्या गंभीर असून त्या सोडविण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी नितीन धांडे यांनी यावेळी केली.
या भेटीदरम्यान डॉ. नितीन धांडे यांच्यासमवेत माजी महापौर संजय नरवणे, माजी सभागृह नेता सुनील काळे, स्थायी समितीच्या माजी सभापती राधा कुरिल, माजी सभापती सचिन रासने, ललित समदूरकर, राजू कुरिल प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रतिनिधी मंडळाने शहरात दैनंदिन साफसफाईच्या कामात येणार्या अडचणी, फॉगिंग व फवार्याच्या व्यवस्थेचा अभाव, भटक्या कुत्र्यांची वाढलेली संख्या, महिला सुरक्षेसाठी आवश्यक असलेले उपाय आदी विषयांवर मनपा आयुक्तांशी चर्चा केली. शहरात सुरक्षेच्यादृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणे, अत्यावश्यक असल्याचे सांगून त्यासाठी महापालिकेने आवश्यक पाउले उचलावित, यावर यावेळी भर देण्यात आला.
अमरावतीकरांचे आरोग्य उत्तम राखले जावे याकरिता हेल्थ वेलनेस सेंटर पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासोबतच महापालिकेच्या दवाखान्यांमधून आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे, औषधांच्या पूरवठ्यात नियमितता असणे तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा पुरविण्यावर भाजपच्या शिष्टमंडळाने भर दिला. शहरात सार्वजनिक वाहतूकीसाठी महापालिकेने 50 ई-बसेस उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करावा, अशी मागणी केली. बजेटमध्ये घोषित बचत गटाच्या मॉलचे निर्माण आणि अमृत योजनेअंतर्गत शहरात 24 तास पाणी उपलब्ध करुन देण्याची मागणी करुन भाजपच्या शिष्टमंडळाने त्यावर आयुक्तांशी चर्चा केली.
मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी शहराची स्वच्छता राखण्यासाठीच्या उपाययोजना आणि अन्य कामांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झाली असल्याचे यावेळी सांगितले. अन्य विषयांवर लवकरच आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी दिला. शिष्टमंडळातील भाजप नेत्यांनी शहरातील सर्व प्रस्तावित प्रकल्पांच्या समिक्षेसाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत एक बैठक आयोजित करण्याची मागणीही मनपा आयुक्तांकडे केली.




