अमरावतीत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

तिरुपती नगरातील घटना

-खोलीतच घेतला गळफास
-मृतक दर्यापूर-खल्लारचा रहिवासी
अमरावती / 20 जुलै : शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिकणार्‍या 19 वर्षीय विद्यार्थ्याने तो राहत असलेल्या भाड्याच्या खोलीतच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी गाडगेनगर परिसरात तिरुपती नगरात उघडकीस आली. हर्षद तुपसुंदर असे मृतक युवकाचे नाव आहे. तो दर्यापूर तालुक्यातील खल्लार या गावातील रहिवासी होता, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
हर्षद तुपसुंदर हा अमरावतीच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता. गाडगेनगरातील तिरुपती कॉलनी येथे एरंडे नामक व्यक्तीच्या घरी तो भाड्याने खोली करुन राहत होता. आज सकाळी तो खोलीतून बाहेर न आल्याने घरमालकाने त्याला आवाज दिले, पण प्रतिसाद मिळाला नाही. काहीतरी अप्रिय घडल्याची शंका आल्याने त्यांनी याबाबत गाडगेनगर पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून खोलीचा दरवाजा उघडला आणि आत प्रवेश केला. तेव्हा हर्षद तुपसुंदरे हा पंख्याला दोरी बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याचा मृत्यु झाला होता.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी मृतदेह खाली काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला आणि घटनास्थळाचा पंचनामा केला. हर्षदने आत्महत्या केली तेव्हा मोबाईलचा हेडफोन त्याच्या कानात तसाच होता. घटनेची माहिती हर्षद तुपसुंदरच्या कुटुंबियांना देण्यात आली. हर्षदने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण स्पष्ट होउ शकले नाही. गाडगेनगर पोलिसांनी अकस्मित मृत्युची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button