महादेवखोरी परिसरात रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य
डबक्यात नाव सोडून वंचितचे आंदोलन

-रहिवाशांमध्ये मनपाविरोधात असंतोष
-अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
अमरावती / 25 जुलै : शहरातच्या पूर्व भागात झोन क्रमांक 3 मध्ये येणार्या महादेवखोरी भागातील सर्वच प्रमुख रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली असून येथे खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. खड्डे बुजविणे आणि रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या कामात महापालिका प्रशासनाकडून हयगय केली जात असल्याचा आरोप करित वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात आज येथील नागरिकांनी आंदोलन केले. साचलेल्या डबक्यांमध्ये कागदाची नाव सोडून महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच येत्या आठ दिवसांत सर्व रस्ते सुरळित केले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
महादेव खोरी परिसरात असलेल्या वरुन नगर, कैलास नगर, गौतम नगर भागातील सर्वच रस्ते उखडून येथे मोठाले खड्डे पडले असल्याने सर्वसामान्य रहिवाशांचे दैनंदिन जीवनच विस्कळित झाले आहे. रस्त्यांच्या दूरवस्थेमुळे नागरिक त्रस्त आहेत. महिला-पुरुष, वृद्ध, शाळकरी मुले-मुली अशा सर्वांनाच या रस्त्यांमुळे मनस्ताप होत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जीव मुठीत घेउनच घरातून बाहेर पडावे लागते, असे या रहिवाशांचे म्हणणे आहे. महापालिका प्रशासनाला वारंवार रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली पण त्यासंदर्भाने प्रशासनाने उदासिन धोरण अवलंबिले आहे.
परिणामी महापालिका प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. महापालिकेचा निषेध नोंदविण्यासाठी आज परिसरातील शेकडो अबालवृद्ध महिला-पुरुष रस्त्यावर उतरले आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात महापालिकेविरोधात आंदोलन केले. पावसामुळे साचलेल्या डबक्यांमुळे या भागात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून सार्वजनिक आरोग्याला त्यातून धोका निर्माण झाला आहे. या नागरिकांनी याच डबक्यात कागदी नाव सोडून प्रशासनाच्या उदासिन धोरणाचा निषेध नोंदविला.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे लहान-मोठे अपघातही घडत आहेत. आठ दिवसांच्या आत जर या रस्त्यांची दूरवस्था दूर केली गेली नाही आणि खड्डे बुजविण्यात आले नाही तर महापालिकेच्या अधिकार्यांना खुर्चीसह उचलून येथे आणू आणि खड्ड्यात टाकू असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे शहर उपाध्यक्ष शैलेश बागडे यांनी यावेळी दिला. मनपाने दिरंगाईचे धोरण सोडून रहिवाशांच्या जिविताचा विचार करावा आणि तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी महिला-पुरुषांकडून करण्यात आली. या आंदोलनात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.




