वीज कर्मचार्यांची विद्युत भवनासमोर तीव्र निदर्शने
राज्यव्यापी संप व आंदोलनात सहभाग

-सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
-खाजगीकरणाच्या धोरणाला विरोध
अमरावती / 9 जुलै: केंद्र आणि राज्य सरकारकडून वीज उद्योगांच्या खाजगीकरणाचा घाट घातला जात असून या धोरणाला विरोध दर्शविण्यासाठी तसेच विविध प्रलंबित मागण्यांकरिता वीज अधिकारी आणि कर्मचार्यांनी आज कॅम्प परिसरातील विद्युत भवनासमोर तीव्र निदर्शने केलीत. आज कामगार, कर्मचारी आणि शेतकरी संघटनांनी संयुक्तरीत्या पूकारलेल्या देशव्यापी संपाचा एक भाग म्हणून हे आंदोलन करण्यात आले. अमरावती शहर आणि जिल्ह्यातील वीज अधिकारी आणि कर्मचारी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
समांतर विद्युत परवाना, प्रिपेड व स्मार्ट मीटर, 329 सबस्टेशन ची कामे कंत्राटी पद्धतीने खाजगी कंपन्या व कंत्राटदारांना देण्याच्या धोरणाला विरोध दर्शवित यातून सरकारच्या महावितरण व महापारेशनसाारख्या कंपन्यांचे अस्तित्वच धोक्यात आल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्या वीज अधिकारी आणि कर्मचार्यांकडून करण्यात आला. महावितरण व महापारेशन कंपनींच्या पुनर्रचनेच्या प्रस्तावालाही यावेळी तीव्र विरोध करण्यात आला. 2019 नंतर मंजूर झालेल्या उपकेंद्रांमध्ये कर्मचार्यांच्या नियुक्त्यांना मंजूरी देण्यात यावी, सर्व अभियंते, अधिकारी आणि कर्मचार्यांच्या पेंशन योजनेला मंजूरी मिळावी, कंत्राटी तत्वावर नियुक्त व बाह्य स्त्रोतातून घेतलेल्याा 43 हजार कर्मचार्यांना योग्य वेतनश्रेणीमध्ये समाविष्ठ करण्यात यावे, रिक्त असलेल्या 40 हजार पदांकरिता भरती करण्यात यावी, वर्ग-1 व वर्ग-4 च्या पदांचा मागासवर्गीयांचा अनूशेष भरुन काढावा, वेतन वृद्धीमध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी एनॉमली कमेटीचे गठन करावे, संपूर्ण राज्यात विद्युत उपकेंद्रामध्ये सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
सर्व सहाय्यकांचा तीन वर्षांचा कालावधी एक वर्षावर आणणे, तीन्ही कंपन्यांमधील अधिकारी, कर्मचार्यांच्या बदल्यांसंदर्भातील धोरण व महानिर्मिती कंपनीमधील नोकर भरती तसेच सेवा शर्थींमध्ये एकतर्फी बदल आणि महापारेषण कंपनीमध्ये 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे प्रकल्प टीबीसीबीला देण्याच्या निर्णयांचा यावेळी जोरदार विरोध करण्यात आला.
या आंदोलनात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीक वर्कर्स फेडरेशन चे महासचिव कृष्णा भोयर, सबॉर्डीनेट इंजीनियर्स एसो. (महावितरण) चे महासचिव संतोष खुमकर, महाराष्ट्र स्टेट विद्युत कामगार कांग्रेस (इंटक) चे मुख्य महासचिव दत्तात्रय गुट्टे, महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन चे अध्यक्ष पी. बी. उके व तांत्रिक कामगार युनियन चे महासचिव प्रभाकर लहाने सहभागी झाले होते. त्यांच्याच नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. अमरावती शहर व जिल्ह्यातील विद्युत अभियंता, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




