अमरावती परिमंडळात वीज बिलाची थकबाकी 156 कोटींवर

वसुलीसाठी महावितरण उचलणार कठोर पावले

-थकबाकीदारांचा वीज पूरवठा खंडित करणार
-अभियंत्यांपासून जनमित्रांपर्यंत सर्वच कामाला
अमरावती / 27 जुलै : महावितरणच्या अमरावती परिमंडळात वीज बिलाची थकबाकी कमी न होता दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. मार्च 2025 मध्ये असलेली 75 कोटीची वीज बिलाची थकबाकी जुलै 2025 मध्ये 156 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे वीजबिलाच्या वसुलीसाठी अधीक्षक अभियंता ते जनमित्र सर्वांना ग्राहकनिहाय थकीत वीजबिल वसूलीचे उध्दीष्ठ देण्यात आले असल्याची माहिती मुख्य अभियंता अमरावती परिमंडळ यांनी दिली आहे. असंख्य थकबाकीदार ग्राहकांकडून वीज बीलाचा भरणा करण्याबाबत उदासिनता दिसून येत असल्याने त्यांच्याविरोधात कठोर पाउले उचलण्याच्या तयारीत महावितरण आहे. अशा ग्राहकांचा वीज पूरवठा खंडित करण्याचा पर्याय अवलंबला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
महावितरणच्या कामकाजाचा डोलारा हा वीजबिलांच्या महसूलावरच उभा आहे. परंतू मार्च 2025 नंतर प्रत्येक महिन्यात अपेक्षीत महसूलाच्या उद्दिष्टाप्रमाणे बिलांची वसूली झालेली नाही. त्यामुळे थकबाकी कमी न होता त्यात वाढ झाली आहे. ही गंभीर बाब ठरत आहे. महावितरणच्या आर्थिक स्थैर्यासाठी वीजबिल वसूलीशिवाय अन्य पर्याय नाही. त्यामुळे थकबाकी आणि चालू वीजबिलाच्या वसुलीवर परिणाम होत असेल तर वीज पुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय नसल्याचे मुख्य अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे.
परिमंडळात विविध वर्गवारीतील 3 लाख 81 हजार 406 ग्राहककांकडे 156 कोटी रूपयांची वीज बीलाची रक्कम थकित आहे. त्यात अमरावती जिल्ह्यातील 1 लाख 90 हजार 936 ग्राहकांचा समावेश असून त्यांच्याकडे 67 कोटी 39 लाख रूपयांची आणि यवतमाळ जिल्ह्यातील 1 लाख 90 हजार 470 ग्राहकांकडे 88 कोटी 81 लाख रूपयाची वीज देयके थकली आहे. अधीक्षक अभियंता ते जनमित्र यांना वसूलीचे उध्दिष्ठ देण्यात आले आहे. परिमंडळात 1 लाख रूपयापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ग्राहकाची संख्या 1157 असून त्यांच्याकडे 32 कोटी 67 लाख रूपये थकीत आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील 472 आणि यवतमाळ जिल्ह्यातील 655 ग्राहकांचा समावेश असून त्यांच्याकडे अनुक्रमे 14.17 कोटी आणि 18.55 कोटी थकीत आहे.
ग्राहकांची वीजबिल भरण्याची उदासिनता बघता महावितरणकडून नाईलाजास्तव वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सक्रीय करण्यात आली आहे. थकबाकी वसुलीसाठी वरिष्ठ अधिकारीही फिल्डवर उतरले आहेत. आगामी दिवसं हे सणासुदीचे असल्याने महावितरणची कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकी आणि वेळेत वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
-अभियंता ते जनमित्र सर्वांनाच वसुलीचे उद्दीष्ट
1 लाख रूपयांपेक्षा जास्त थकबाकी असणार्‍या ग्राहकाची तपासणी व थकित वीज बिलाच्या रकमेची वसुली अधीक्षक अभियंता यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. 50 हजार ते 1 लाख रूपयापर्यंत थकबाकी असलेल्या ग्राहकाकडून करण्याचे काम कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे. 25 ते 50 हजार रूपयाची थकबाकी असणार्‍या ग्राहकांकडून उपकार्यकारी अभियंता तर 5 हजार ते 25 हजार थकबाकी असलेल्या ग्राहकांकडून शाखा अभियंता आणि 5 हजारापर्यंत थकबाकी असलेल्या ग्राहकाच्या थकबाकीच वसूली जनमित्रांना करावयाची आहे.

संबंधित बातम्या

Back to top button