लाडकी बहिण योजनेतून निवडणुकीचा खेळ
बच्चू कडूंचा महायुतीवर आरोप

-निवडणूक आयोगावरही ताशेरे
अमरावती / 17 सप्टेंबर : लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांचा वापर केवळ निवडणुकीसाठी करून नंतर त्यांना अपात्र ठरविण्यात आल्याचा गंभीर आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर केला आहे. त्यांनी अमरावतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी कर्जमाफी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि उद्योगपतींसाठी केलेली कर्जसवलत आदी मुद्द्यांवर सरकारला कडवे प्रश्न विचारले.
बच्चू कडू यांनी आरोप केला की, विधानसभा निवडणुकांपूर्वी महायुती सरकारने महिलांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहिण योजनेतून एकाचवेळी तीन महिन्यांचा हप्ता देऊन त्यांना भुलवले. मात्र निवडणुका पार पडल्यानंतर लगेचच अर्ध्याहून अधिक लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्यात आले. यासोबतच निधीअभावी लाडका भाऊ प्रशिक्षणार्थी योजना देखील तत्काळ बंद करण्यात आली. त्यामुळे या योजनांची घोषणा ही केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली असून महिलांना व युवकांना स्थायी मदत करण्याचा सरकारचा कोणताही उद्देश नव्हता, असे कडू यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयीही कडूंनी शंका व्यक्त केली. सध्या राज्य सरकारला प्रशासक राज चालू ठेवायचा असून त्याद्वारे स्थानिक संस्थांवर पूर्ण नियंत्रण ठेवून ‘माल जमा’ करण्याचा सरकारचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी खिल्ली उडवत म्हटले की, आता प्रत्यक्षात निवडणूक आयोगालाच भाजप कार्यालयांमधून चालविले पाहिजे आणि इव्हीएम मशिन्सही त्याठिकाणी ठेवाव्यात. कारण लोक जरी मतदानासाठी आले तरी बटण दाबण्याचे काम भाजपच करेल अशी परिस्थिती दिसत आहे.
पत्रकारांशी बोलताना कडूंनी पुन्हा एकदा शेतकर्यांच्या कर्जमाफीची मागणी प्रखरतेने मांडली. उद्योगपतींचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज सरकार माफ करू शकते, तर अन्नदाता शेतकर्यांचे कर्ज माफ करण्यात असा कोणता अडथळा आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारने शेतकरी वर्गाची उपेक्षा बंद करून तातडीने कर्जमाफी करावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.




