अमरावती ग्रामीणमधील आठ पोलीस कर्मचारी निलंबित
चांदुर रेल्वे येथील खुनाचा गुन्हा प्रकरणात

चांदूर रेल्वे/3 नोव्हेंबर : पकड वॉरंट मधील अटक आरोपीच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी अहवालानंतर, चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमधील आठ पोलीस कर्मचार्यांविरुद्ध 2 नोव्हेंबर 2025 रोजी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये संबंधित कर्मचार्यांविरुद्ध अपराध क्रमांक 611/2025, भारतीय दंड विधान कलम 302 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांनी नमूद सर्व 8 पोलीस अंम लदार यांना आज रोजी निलंबित केले आहे. निलंबित करण्यात आलेल्या कर्मचार्यांमध्ये चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या सपोउपनि राजकुमार मुलामचंद जैन, बं.न. 1127, पोलीस हवालदार विशाल मुकुंदराव रंगारी, ब.नं. 2269, महिला पोलीस शिपाई अश्विनी शामरावजी आखरे, ब.नं. 929, महिला पोलीस शिपाई सरिता वैद्य, ब.नं. 1204, पोलीस हवालदार प्रविण रामदास मेश्राम, ब.नं. 1777, पोलीस शिपाई अलीम हकीम गवळी, ब.नं. 848, पोलीस शिपाई अमोल अमृतराव घोडे, बं.न. 164, पोलीस नाईक प्रशांत ढोके, ब.नं. 1753 कर्मचार्यांचा समावेश आहे. न्यायालयीन चौकशी अहवालात, आरोपीच्या मृत्यूसाठी गार्ड इंचार्ज व गार्ड ड्युटीवर असलेले पोलीस अंमलदार यांना जबाबदार धरण्यात आले असून नमूद पोलीस अंमलदार यांच्याया कृत्यामुळे पोलीस दलाची जनमानसात बदनामी झाली असून, कर्मचार्यांनी अत्यंत बेशिस्त, बेजबाबदार व निष्काळजीपणा दाखवला असल्याचा ठपका त्यांचेवर ठेवण्यात आला आहे. निलंबन कालावधीत या सर्व कर्मचार्यांचे मुख्यालय पोलीस मुख्यालय, अमरावती ग्रामीण हे राहील.त्याचप्रमाणे न्यायालयीन चौकशीत दोषी आढळलेले पोलीस निरीक्षक श्री.अजय अहिरकर तात्कालीन ठाणेदार पोलीस स्टेशन चांदुर रेल्वे यांचे विरुद्ध कारवाई करिता वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात आलेला आहे.




