शिवणगावात जाणवले भूकंपाचे धक्के
ग्रामस्थांमध्ये भीती

* सुदैवाने कुठलीही हानी नाही
तिवसा /17 ऑक्टोबर : जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिवणगाव फत्तेपूर येथे शुक्रवारी दुपारी 1.15 ते 1.20 वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या धक्क्यांमुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. गावात उपस्थित तलाठी आणि ग्रामसचिवांनी ही माहिती जिल्हा प्रशासनाला दिली. दुपारी अचानक परिसरात हादरे जाणवले, काही लोकांच्या घरातील भांडी खाली पडली, ज्यामुळे एकच खळबळ उडाली. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांना पत्राद्वारे ही माहिती कळवली आहे. शिवणगाव फत्तेपूर येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती गावकर्यांनी दिली, तसेच याआधी सुद्धा परिसरात अशा धक्क्यांचे अनुभव आलेले आहेत. या धक्क्यांमुळे कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही, तसेच राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर भूकंपाच्या तीव्रतेबाबत कोणताही संदेश प्राप्त झालेला नाही. भूकंपाची तीव्रता आणि क्षेत्री तपासणी करण्यासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, मध्य विभाग, नागपूर येथील पथक घटनास्थळी पाठवण्याबाबत अतिरिक्त महासंचालकांना विनंती करण्यात आली आहे.
याआधी 7 सप्टेंबरला तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथे देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते; सकाळी अचानक अनेक घरातील पाट्यांवर ठेवलेली भांडी जमिनीवर कोसळली, काही जण शेतात हादरा बसतोय असे लक्षात आले आणि ग्रामस्थांमध्ये भीती पसरली. दोन वर्षांपूर्वी देखील जमिनीला हादरा बसल्याची घटना घडली होती, असे गावकर्यांनी सांगितले. शिरजगाव मोझरी येथील भूकंपाबाबत नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या संकेतस्थळावर कोणतीही नोंद आढळली नव्हती. तहसीलदारांसह महसूल विभागाचे पथक गावात जाऊन आले आणि कुठलेही नुकसान झाले नाही हे आढळले.
जून महिन्यात चार तारखेला रात्री नऊ वाजता अमरावती जिल्ह्यात मध्य प्रदेशाच्या सीमेवर रिष्टर स्केलवर 3.8 तीव्रतेचा भूकंप झाला होता, अशी माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र आणि नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने दिली होती. या भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाले नव्हते, तसेच मध्य प्रदेशातील खंडवा आणि बर्हाणपूर जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून दहा किलोमीटर खाली होता.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या वेबसाईटवर भूकंपाबाबत कोणतीही नोंद किंवा तीव्रता दिसून आली नाही. घटनेचे सर्वेक्षण व अहवाल मागणी करिता महासंचालक, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग यांना ई-मेलवर निवासी उपजिल्हाधिकारी यांचे पत्र पाठविले असून सर्वेक्षण पथक मागणीबाबत विनंती केली आहे.
-डॉ. मयूर कळसे, तहसीलदार तिवसा.




