जिल्ह्यात उत्सवांच्या काळात ध्वनीक्षेपकांना रात्री 12 पर्यंत मुभा

जिल्हाधिकार्‍यांचे 15 दिवसांच्या शिथिलतेचे आदेश

अमरावती /17 फेब्रुवारी : आगामी विविध सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील नागरिकांसाठी प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. जिल्ह्यात ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेच्या वापरासाठी वर्षभरातील एकूण 15 दिवसांची विशेष शिथिलता देण्याचे आदेश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जारी केले आहेत. केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम 2017 मधील तरतुदींचा आधार घेत ही परवानगी देण्यात आली आहे. या आदेशानुसार, निश्चित केलेल्या उत्सवांच्या दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरता येणार आहे. एरव्ही रात्री 10 वाजेपर्यंत असलेली ही मर्यादा आता काही विशेष दिवसांसाठी वाढवण्यात आली आहे. ज्या उत्सवांसाठी ही सवलत लागू असेल त्यात प्रामुख्याने 19 फेब्रुवारी रोजीची शिवजयंती, 26 मार्चला श्रीराम नवमी, 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि 1 मे रोजीच्या महाराष्ट्र दिनाचा समावेश आहे.तसेच वर्षाच्या उत्तरार्धात 4 सप्टेंबरला श्रीकृष्ण जयंती, 14 सप्टेंबरला गणपती उत्सव, 25 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आणि 15 ऑक्टोबरला नवरात्र पंचमीसाठी ही सूट असेल.

संबंधित बातम्या

Back to top button