मोबाईलमुळे जबरी चोरीतील आरोपी अडकले जाळ्यात

एक वर्षानंतर दोघांना अटक

-अकोली रिंगरोडवरील घटना
-बडनेरा डीबी स्कॉडची कारवाई
बडनेरा / 23 जुलै : साई नगर येथील 37 वर्षीय युवकाला बडनेरा-अकोली मार्गावर अडविल्यानंतर दोन अज्ञात भामट्यांनी त्याला बेदम मारहाण करित लुटले होते. एक वर्षापूर्वी 17 जुलै 2024 रोजी घडलेल्या या जबरी चोरी प्रकरणातील दोन्ही आरोपींना गजाआड करण्यात बडनेरा पोलिसांच्या डीबी स्कॉडला यश प्राप्त झाले आहे. या आरोपींनी त्यावेळी तक्रारकर्त्याकडून लुटलेला मोबाईल वापरात काढला आणि तोच आरोपींच्या अटकेचे कारण ठरला. बडनेरा डीबी पथक मोबाईलच्या लोकेशनवरुन आरोपींपर्यंत पोहोचले आणि शिताफीने त्यांना जेरबंद केले.
मयुर महेंद्र पंडित (21) आणि अनंता उर्फ आनंद जयदेव सिरसाठ (38, दोघेही रा. खोलापुरी गेट, भातकुली रोड, अमरावती) अशी आरोपींची नावे आहेत. यासंदर्भात प्रणव वसंतराव शिंदे (37, रा. साई हेरिटेज, साईनगर अमरावती) या युवकाने बडनेरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. प्रणव 17 जुलै 2024 रोजी बडनेरा चमण नगर ते अकोली रिंगरोडने जात असताना दोघांनी त्याला वाटेत अडविले होते. त्यांनी प्रणवला लाथा-बूक्क्यांनी जबर मारहाण केली आणि त्याच्या खिशातील विवो कंपनीचा 12 हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला होता.
प्रणव शिंदेच्या तक्रारीवरुन बडनेरा पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला होता. डीबी स्कॉडकडे प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला होता. मात्र बरेच महिने उलटून गेल्यानंतरही आरोपी पोलिसांच्या गळाला लागले नाहीत. दरम्यान, प्रकरण थंडबस्त्यात पडल्याचे मानून एका आरोपीने प्रणव शिंदे याने चोरलेला मोबाईल वापरायला सुरुवात केली आणि हिच बाब डीबी स्कॉडच्या पथ्थ्यावर पडली. तांत्रिक तपासाद्वारे मोबाईलची लोकेशन समजताच डीबी पथक आरोपी मयुर पंडितपर्यंत पोहोचले आणि त्याला अटक केली. मयुरने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी त्याचा दुसरा साथीदार अनंता सिरसाठ यालाही अटक केली. दोन्ही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कारवाई बडनेरा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनील चव्हाण, पोलिस निरिक्षक प्रफुल्ल गिते यांच्या नेतृत्वात उपनिरिक्षक सचिन माकोडे, डीबी पथक प्रमुख सुधीर प्रांजळे, पोलिस कर्मचारी रोशन निसंग, शशिकांत शेळके, धनराज ठाकुर, मोहम्मद समिर आणि शुभम कडुकार यांनी केली.

संबंधित बातम्या

Back to top button