1.90 कोटीचे अंमली पदार्थ नष्ट

शहर पोलिसांची कारवाई

* 52 ठिकाणांवरील मादक पदार्थांचा निपटारा

अमरावती/ 30 सप्टेंबर अमरावती शहर पोलिस आयुक्तालयातील विविध पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या 47 गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेला 1 कोटी 79 लाख 36 हजार 340 रुपयांचा 896.817 किलोग्राम गांजा, तसेच 5 गुन्ह्यातील 10 लाख 75 हजार 250 रुपयांचा 215 ग्रॅम एमडी अंमली पदार्थ यांसह एकूण 52 गुन्ह्यातील एकूण 1 कोटी 90 लाख 11 हजार 590 रूपयांचा अंमली पदार्थ 29 सप्टेंबर रोजी अमरावतीच्या केंद्रीय गोदामातून नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर लिमिटेड कंपनीत नेऊन इंसीनेटरच्या मदतीने जाळून नष्ट करण्यात आला.

यामध्ये अमरावती शहर पोलिस आयुक्तालयातील सन 1996 पासून दाखल असलेल्या नागपुरी गेट पोलिस ठाण्यातील 26 केसेस, पोलिस ठाणे बडनेरा येथील 8 केसेस, पोलिस ठाणे गाडगेनगर येथील 11 केसेस, पोलिस ठाणे खोलापुरी गेट येथील 3 केसेस, पोलिस ठाणे नांदगाव पेठ येथील 2 केसेस, पोलिस ठाणे फेजरपुरा येथील 1 केस व पोलिस ठाणे वलगाव येथील 1 केस यांसह एकूण 52 केसेस समाविष्ट होत्या. या प्रकरणांचा न्यायालयीन निकाल लागू असल्याने त्या प्रकरणातील गांजा व एमडी मुद्देमाल नष्ट करण्यासाठी पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशाने पोलिस उपायुक्त रमेश धुमाळ, उपायुक्त श्याम घुगे आणि अन्य एक अधिकारी अशा त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती.

या समितीच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी मिळवून हा सर्व मुद्देमाल नागपूर येथे नष्ट करण्यात आला. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र एनव्हायरो पॉवरचे मॅनेजर, दोन पंच, पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांची उपस्थिती होती. या प्रक्रियेत गुन्हे शाखा अमरावती शहराच्या पोलिस निरीक्षक सीमा दाताळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश इंगळे, उपनिरीक्षक कैलास सानप, कर्मचारी अजय मिश्रा, सुधीर गुडधे, संभाजी केद्रे आणि चालक नितीन लांडगे यांनी काम पाहिले.

संबंधित बातम्या

Back to top button