ट्युमरवर डॉ. स्वरूप गांधी यांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया, महिलेस जीवदान

डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे

अमरावती /4 फेब्रुवारी : डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मेंदू व मणक्याशी संबंधित अत्यंत गुंतागुंतीच्या ट्युमरवर यशस्वी शस्त्रक्रिया करून डॉक्टरांच्या पथकाने वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. महाविद्यालयातील न्युरोसर्जन डॉ. स्वरूप गांधी तसेच तज्ञ् चमूच्या समन्वयातून व आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे.
30 वर्षीय महिला रुग्णाला चक्कर येणे, उजव्या कानाने कमी ऐकू येणे, चालताना अडचण येणे, चेहर्‍यावर लकवा (फेशियल पाल्सी) तसेच डाव्या बाजूला अशक्तपणा अशी लक्षणे जाणवत होती. एमआरआय तपासणीत उजव्या बाजूच्या सेरेबेलोपॉन्टाईन अँगल भागात ट्युमर असून त्याचा मेंदूच्या महत्त्वाच्या भागावर (ब्रेनस्टेम) दाव येत असल्याचे निदान झाले. तज्ञ् डॉक्टरांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने रुग्णावर शस्त्रक्रिया करत रेट्रोमास्टॉईड सबऑक्सिपिटल कॅनिएक्टॉमी पद्धतीने ट्युमर पूर्णतः काढून टाकला. हा ट्युमर आठव्या मज्जातंतूशी (8ओ पर्शीींश) संबंधित सिस्टिक श्वान्नोमा प्रकारातील असून तो ब्रेनस्टेम व सेरेबेलमला घट्ट चिकटलेला असल्या मुळे शस्त्रक्रिया अतिशय आव्हानात्मक होती. कारण ब्रेनस्टेमला इजा झाल्यास रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र डॉक्टरांच्या अचूक नियोजन व कौशल्यपूर्ण प्रयत्नांमुळे शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असून रुग्णाची शस्त्रक्रियेनंतरची प्रकृती स्थिर आहे. तिच्यातील न्यूरोलॉजिकल त्रुटी हळूहळू सुधारत असून ती लवकरच पूर्णपणे बरी होईल, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. या शस्त्रक्रियेसाठी उत्कृष्ट सहकार्य केल्याबद्दल न्यूरोसर्जन डॉ.अमोल ढगे यांचे विशेष आभार मानण्यात आले.

संबंधित बातम्या

Back to top button